२८ नव्हे, १४ दिवसांनी करा रक्तदान
नवा बदल : रक्ताचा तुटवडा दूर होण्यास लागणार हातभार
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतरच रक्तदान करता येत होते. दुसरा डोसही २८ दिवसांनंतरच येतो. त्यामुळे किमान दोन महिने रक्तदान करता येत नव्हते. परंतु, आता कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा दूर होण्यास हातभार लागण्यास मदत होणार आहे.
देशभरात कोरोनाला प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आता तर १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. रक्तदान करण्यात तरुणाई आघाडीवर असते. यात लसीकरणानंतर नागरिकांना २८ दिवसांआधी रक्तदान करता येणार नसल्याचे यापूर्वी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सूचित केले होते. परंतु, नियमात बदल करीत उपलब्ध लस घेल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करू शकता येणार असल्याचे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने जाहीर केले आहे. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी आता केवळ १४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रक्तदानाचे आवाहन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरात बऱ्यापैकी रक्तसाठा असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे सांगण्यात आले. मागील महिन्यांत रक्तपेढीत येऊन ९०४ दात्यांनी रक्तदान केल्याचे दत्ताजी भाले रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी आप्पासाहेब सोमासेे म्हणाले.
--
गाईडलाईन बदलली
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने गाईडलाईन बदलली. त्यामुळे आता लस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. रक्तदान केल्यानंतर केल्यानंतरही लस घेता येऊ शकते. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे.
-डाॅ. मंजूषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढी
-----
१५ दिवसांचा साठा
रक्तपेढीत सध्या १५ दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. नव्या बदलानुसार आता १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे.
-हनुमान रुळे, जनसंपर्क अधिकारी, विभागीय रक्तपेढी, घाटी