पोपट नरवडे हे आज, गुरुवारी दुचाकी (क्र. एम. एच.१५, क्यू. ९९३०) वरून औरंगाबादहून वाळूजच्या दिशेने चालले होते. ए. एस. क्लब चौफुलीजवळ लासूरकडून लिंकरोडच्या दिशेने जेसीबी घेऊन जाणाऱ्या कंटेनर (क्र. एच. आर. ५५, आर. १५३१) च्या चालकाने दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास पोपट नरवडे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कंटेनरच्या खाली सापडल्याने नरवडे हे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात पाहताच लिंक रोड चौफुलीवर कर्तव्य बजावणारे वाहतूक शाखेचे पो.हे.कॉ. राजेंद्र उदे, पो. कॉ. शेखर राऊतराय, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार काकासाहेब जगदाळे आदींनी नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी पोपट नरवडे यांना पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास पोपट नरवडे यांची प्राणज्योत मालवली. या अपघातानंतर घटनास्थळावरून कंटेनरचालक फरार झाला आहे. या अपघाताची एमआयडीसी वाळूज ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे करीत आहेत.
कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST