लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी महावितरणने सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेला तीन वेळा मुदतवाढ मिळूनही केवळ १ हजार ९६६ ग्राहकांनीच योजनेचा लाभ घेतला आहे़ त्यामुळे या योजनेकडे जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे़कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने १ नोव्हेंबर २०१६ पासून नवप्रकाश योजना सुरू केली़ या योजने अंतर्गत जिल्ह्यातील ७८ हजार ग्राहक येतात़ या वीज ग्राहकांकडे महावितरणची ९६ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे़ त्यामुळे नवप्रकाश योजनेत आपल्याकडे थकबाकीची मूळ रक्कम भरणाºया ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिेस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णत: सूट देण्यात आली आहे़ तसेच ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज भासणार नाही़ या शिवाय वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे़ तसेच या योजनेत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी आपल्या मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराच्या १०० टक्के रकमेत सूट देण्यात येते़या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त थकबाकीदार ग्राहक सहभाग घेतील व महावितरणची ग्राहकांकडे असलेली मूळ थकबाकी वसूल होईल, या उद्देशाने ही योजना अंमलात आणली़ परंतु, १ नोव्हेंबर २०१६ पासून या योजनेला महावितरणच्या वतीने ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली़ परंतु, आतापर्यंत जिल्ह्यातील ७८ हजार थकबाकीदार ग्राहकांपैकी केवळ १ हजार ९६६ वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत केवळ ८५ लाख रुपयांचा भरणा केला आहे़ त्यामुळे या योजनेतील जिल्ह्यातील जवळपास ७५ हजार ग्राहकांकडे ८० कोटी रुपयांची थकबाकी जैसे थेच आहे़
नवप्रकाश योजनेकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:28 IST