छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जानेवारी २०१३ मध्ये आठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. त्यात मंत्रालयातील प्रशासकीय विभाग आणि शासनाच्या विविध कार्यालयांतील ७ हजार ३४ लिपिक-टंकलेखक पदांचा समावेश होता. या आठ पदांपैकी सहाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेले तरुण शासनाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मात्र, ७ हजार ३४ पदांसाठी १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी कौशल्य चाचणी दिलेली असून, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यास महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण औरंगाबाद (मॅट) मध्ये आव्हान देण्यात आले. त्यामुळे पात्र तरुणांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे १५ हजारांवर तरुणांचा जीव टांगणीला लागला असून, राज्य शासनातील १० पेक्षा अधिक मंत्र्यांनी निवेदन देऊन निकाल जाहीर करण्याची मागणी युवकांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी २०२३ मध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक या आठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीनुसार कर सहायक व लिपिक-टंकलेखक या दोन पदांची अंतिम निवड यादी जाहीर होणार बाकी आहे. उर्वरित सहा पदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लिपिक-टंकलेखक पदासाठी ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्व, १७ डिसेंबर २०२३ रोजी मुख्य आणि ४ ते १३ जुलैदरम्यान कौशल्य चाचणी परीक्षा घेण्यात आली. निकालही ३० सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर झाला. त्यानंतर सर्व गुणांची एकत्रित अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. काही तरुणांनी ‘मॅट’च्या औरंगाबाद खंडपीठात कौशल्य चाचणीला आव्हान दिले. तेथे अद्याप निकाल लागलेला नाही.
तरुणांचे मंत्र्यांना साकडेकौशल्य चाचणी दिलेल्या तरुणांनी अंतिम निवड यादी लवकर जाहीर व्हावी, यासाठी एमपीएससीसह राज्य शासनातील अनेक मंत्र्यांना निवेदन दिले.‘मॅट’मध्ये सक्षमपणे बाजू मांडून निकाल जाहीर करण्यासाठी तत्परता दाखवावी, अशी मागणी केली. हसन मुश्रीफ, संजय शिरसाट, उदय सामंत, दत्ता भरणे, शिवेंद्रराजे भोसले, प्रकाश आबिटकर, नितेश राणे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक सत्ताधारी आमदारांना निवेदन दिल्याची माहिती युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लिपिक-टंकलेखन संदर्भात मॅटमध्ये आव्हान देण्यात आलेले आहे. त्याठिकाणी निकाल लागल्यानंतर तत्काळ अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.- डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.