औरंगाबाद : शहरात आज महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या अभियानात शिवसेना-भाजपा असे राजकारण शिरल्यामुळे अभियानाला प्रशासकीय पातळीवरच राबवावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ते अभियान देशभर राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली, शिवाय सोबत भाजपाची राजकीय यंत्रणाही तयारीला लागली. शहरात भाजपाबहुल वॉर्डांमध्ये ते अभियान राबविले गेले. मात्र, उर्वरित शिवसेनेच्या वॉर्डांतून त्या अभियानाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेतील अधिकाऱ्यांनी शहरभर अभियान राबविण्यासाठी तयारी केली. काही वॉर्डांमध्येही नगरसेवकांनी पुढाकार घेतला. शिवसेना नगरसेवकांनी त्या अभियानाला ठेंगा दाखविला. महायुतीचा घटस्फ ोट झाल्यानंतर सेना-भाजपातील कार्यकर्त्यांमध्ये चुरशीचे राजकारण पेटले आहे. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांकडे खुनशी वृत्तीने पाहत आहेत. त्या खुनशी वृत्तीतूनच शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झालेली आहे. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते समोरासमोरूनही जात नाहीयेत. या ईर्षेतूनच सेना वॉर्डांमध्ये स्वच्छता अभियानास फाटा देण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक असलेले वॉर्ड वगळता इतर भागांत स्वच्छता अभियानातून मोठ्या प्रमाणात कचरा संकलन करण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीदेखील या मोहिमेला राजकीय रंग देऊन नगरसेवकांना अभियानापासून फटकून राहण्याचे आदेश दिल्याची चर्चा होती.
भाजपाच्या वॉर्डातच स्वच्छता अभियान
By admin | Updated: October 3, 2014 00:37 IST