लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१६-१७ वर्षातील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. त्या शेतकऱ्यांच्या विमा रकमेपोटी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामात लागणाऱ्या खत, औषधी, बी-बियाणे खरेदी करण्यास वाव मिळणार आहे़ जिल्ह्यात गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता.जिल्ह्यात ५ लाख हेक्टरच्या वर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती़ परंतु, २०१६-१७ च्या खरीप हंगामात अवकाळी पाऊस झाला. तसेच नियमित पावसानेही उघडीप दिल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस इ. पिकांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर गतवर्षीच्या खरीप हंगामातही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता़ त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकाचा पीकविमा उतरविला होता़ २०१६-१७ या खरीप हंगामाच्या पीकविम्यापोटी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने जवळपास ५१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे़ त्यापैकी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांच्या पीकविम्याची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे़ त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ ही रक्कम उपलब्ध करून दिल्यास औषधी, खत, बियाणे खरेदी करण्यास दिलासा मिळणार आहे़ शासनाने पीक कर्जासाठी अजूनही पुढाकार घेतला नाही़ त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत़ तेव्हा बँकांकडे उपलब्ध झालेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़
५० कोटींचा पीक विमा बँकांकडे वर्ग
By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST