पूर्णा : माटेगाव-सुरवाडी या दोन गावांच्या शेतशिवारांना जोडण्यासाठी रस्त्याची आवश्यकता होती. दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्ता तयार केल्यामुळे अडचण दूर झाली आहे. माटेगाव व सुरवाडी या दोन गावातील शिवारांना जोडणाऱ्या शिव रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाणे देखील कठीण झाले होते. दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते व बियाणे नेण्यासाठी व अन्य साहित्य शेतात नेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत होती. यासाठी त्यांना दूरवरून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याने जावे लागत होते़ उन्हाळा व पावसाळ्यात सदरील रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी लोकसहभागातून रस्ता करण्याचे ठरविले. त्यानंतर लोकवर्गणीतून जेसीबी मशिनद्वारे सदरील रस्ता तयार केला. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेऊन वर्गणी जमा करण्याचे ठरविले व सर्वांंची सहमती घेतली. यासाठी तलाठी सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष रस्त्याचे मोजमाप करून रस्ता कसा तयार करायचा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी दीड ते दोन कि. मी. लांबीचा रस्ता तयार केला. या रस्त्यामुळे दोन्ही गावातील शेत शिवार असलेल्या शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे. यासाठी उपसरपंच त्र्यंबक बोबडे, संभाजी बोबडे, रंगनाथ वाटोडे, गोपाळ वाटोडे, तातेराव पाचपोर, सोपान कोरडे आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
लोकवर्गणीतून केला शिवरस्ता
By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST