औरंगाबाद : जायकवाडी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. महापालिकेला आता मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागत असून, शुक्रवारी सहा इमर्जन्सी पंप सुरू करावे लागले.मागील काही वर्षांपासून जायकवाडी जलाशयात पाणी कमी येत असल्याने ऐन उन्हाळ्यात मृत पाणीसाठ्यावर औरंगाबादसह इतर शहरांना तहान भागवावी लागत आहे. दरवर्षी हा त्रास सुरू झाल्याने तीन वर्षांपूर्वी मनपाने मृतसाठ्यातून मनपाच्या पंप हाऊसपर्यंत एक स्वतंत्र अॅप्रोच चॅनल तयार केला आहे. या अॅप्रोच चॅनलच्या माध्यमातून मनपाच्या इमर्जन्सी पंपापर्यंत पाणी येते. यंदाही जलाशयाचा पाणीसाठा मृतसाठ्यापर्यंत गेला. त्यामुळे औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला पाणी उपसा करताना बराच त्रास सहन करावा लागत होता. दररोज मनपा १५६ एमएलडी पाणी जायकवाडीतून घेते. पाणी उपशावर परिणाम होत असल्याने शुक्रवारी इमर्जन्सीमधील सहा पंप सुरू करण्यात आले. यावेळी मनपाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, कंपनीचे देखभाल व दुरुस्ती प्रमुख रमेश सोनकांबळे, महेश देशपांडे, मनपाचे उपअभियंता यू.जी. शिरसाट आदींची उपस्थिती होती.
शहराची तहान मृत पाणीसाठ्यावर
By admin | Updated: March 26, 2016 00:57 IST