लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एमजीएम परिसरातील सुमारे ३ ते ४ एकर जमीन आयकर विभाग कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थानांसाठी देण्याची तयारी असून, २५० कोटींत ही जमीन विकण्याबाबत सिडको प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. सिडको जागा देण्याच्या पूर्ण मानसिकतेत आहे. ले-आऊटऐवजी जेवढी जागा आहे ती आयकर विभागाला दिल्यास सिडकोला भूतो न भविष्यती अशी अडीच अब्जाची लॉटरीच लागणार आहे. एकरी ८० कोटी रुपये इतका भाव सिडकोच्या जमिनीला पहिल्यांदाच मिळतो आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती जमीन जवळपास देण्याचा निर्णय झाला आहे. बाजारभावानुसार रक्कम मिळताच व्यवहार पूर्ण होईल. सिडको मुख्यालय आणि आयकर विभागात थेट व्यवहार होईल. आयकर विभागाचे कार्यालय आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्याचा त्यांचा उद्देश आहे. याबाबत मुख्यालय निर्णय घेणार आहे. सिडकोला आजवर कुठल्याही जमिनीचे एवढे भाव मिळालेले नाहीत. पूर्वीच्या ले-आऊटमध्ये १५ प्लॉट ३ एकरमध्ये पाडण्यात आले होते. त्यातील फक्त १ प्लॉट विक्री झाला आहे. उर्वरित १४ प्लॉट भावाअभावी पडून राहिल्यामुळे सिडकोने वारंवार जाहिरात करूनही त्या प्लॉटला ग्राहक मिळाले नाहीत. आयकर विभागाला लमसम जमीन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे हेच ले-आऊट ठेवायचे की दुसरे तयार करायचे, याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही.
सिडको एमजीएमलगतची जमीन २५० कोटींना विकणार
By admin | Updated: July 8, 2017 00:41 IST