उस्मानाबाद : आज बालकामगारविरोधी दिन. या दिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी शहरामध्ये फेरफटका मारला असता चहाचे गाडे, पानटपऱ्या, लहान-मोठी हॉटेल्स, फळविक्रीचे गाडे आदी ठिकाणी कोवळे हात राब-राब राबताना दिसून आले. काहीजण मजबुरी म्हणून तर काहीजण घरच्यांना मदत म्हणून काम करत होते. कारण काहीही असले तरी खेळण्या बागडण्याच्या वयात ही मुले कामाला जुंपली गेली आहेत. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेकडून वर्षभरात एकही कारवाई झालेली नाही. १२ जून हा बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. बालकामगार कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. असे असतानाही शहरामध्ये ठिकठिकाणी खेळण्या-बागडण्याचे वय असणारी मुले वेगवेगळ्या व्यवसायात राबताना दिसत आहेत. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंचायत समितीसमोरील एका ज्युसच्या गाड्यावर दोन मुले काम करत होती. ‘साहेब’ म्हणत ज्यूसने भरलेला ग्लास ग्राहकाच्या हातात ठेवत होते. ही दोन्हीही मुले मागील काही महिन्यांपासून हे काम करीत आहेत. त्यानंतर उस्मानाबाद-तुळजापूर रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गॅरेज आहेत. येथे काही दुकानात लहान मुले काम करीत होते. याच रस्त्यालगत एका छोट्याशा हॉटेलमध्ये लहान मुलगा चहा बनविण्यापासून ते टेबल पुसणे, पाणी देणे आदी कामे एकटाच करत होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उन्हाने जिवाची काहीली होत असताना अण्णा भाऊ साठे चौक ते दर्गाह रस्त्यावर तीन मुले भंगार वस्तूंचे लहान लहान तुकडे करुन बॅगमध्ये भरत होती. हेच चित्र येथून काही अंतर पुढे गेल्यानंतर पहावयास मिळाले. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बार्शी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक आठ ते नऊ वर्षाचा मुलगा आणि दुसरा बारा ते तेरा वर्षाचा मुलगा हे दोघे हातगाड्यावर काही सामान टाकून घेऊन जाताना दिसून आले. चढणीच्या रस्त्याला हा गाडा रेटताना त्यांचा जीव कासावीस होत होता. असे असतानाही कामगार कार्यालयामधून आजवर कुठल्याही स्वरुपाची कार्यवाही झालेली नाही, हे विशेष.तक्रार कोणाकडे करावीकोणतीही व्यक्ती, पोलिस निरीक्षक अथवा निरीक्षक, महानगर दंडाधिकारी, प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेटकडे. जेथे मुलाचे वय हा विवादाचा विषय असेल तेथे निरीक्षक प्रकरण निर्धारित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवू शकतात.तक्रार कशी नोंदवावीजेथे न्यायाधीश अधिनियमांतर्गत तक्रारीचा स्वीकार करतो तेथे ठेकेदाराला नोटीस पाठविली जाते. ज्याला त्या तक्रारीचे उत्तर देणे भाग असते.साक्षी पुराव्यानंतर आणि दोन्हीही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय निकाल देते. कलम ३ अंतर्गत ३ महिने ते एक वर्षांचा कारावास किंवा दहा हजार ते वीस हजारांपर्यंत दंड असू शकतो.गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास त्या व्यक्तीला सहा महिने ते दोन वर्षांचा कारावास होऊ शकतो.कलम ९, ११ आणि १२ अंतर्गत दंड हा एक महिन्याचा साधा कारावास असतो किंवा दहा हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही असू शकते.वय वर्षे १४ पेक्षा लहान असलेल्या कोणत्याही मुलांना कारखान्यांमध्ये काम करण्याची परवानगी नसते. कारखाना अधिनियमात या गोष्टीला बंदी घातली आहे. वय वर्ष १४ ते १८ वर्षाच्या मुलांना आपले वयाचे प्रमाणपत्र आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यास मुलांना कारखान्यात काम करता येते. तक्रार कोणत्या कलमांतर्गत येतेकलम ३ : प्रतिबंधात्मक व्यवसाय आणि प्रक्रिया.कलम ९ : निरीक्षकाला सूचना.कलम ११ : रजिस्टरचे व्यवस्थापन.कलम १२ : सूचना प्रदर्शित करणे.
चिमुकल्यांचे कोवळे हात राबताहेत पोटासाठी
By admin | Updated: June 12, 2014 01:38 IST