पाटोदा: तालुक्यातील वाघीरा येथे एका अल्पवयीन मुलीच्या विवाह समारंभाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. पाटोदा पोलिस वेळीच घटनास्थळी गेल्याने होणारा बाल विवाह टळला. पाटोदा तालुक्यातील वाघीरा येथे एका साडेसतरा वर्षीय मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पाटोदा पोलिसांना चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्वशील कांबळे यांनी कळवली होती. तत्पूर्वी वधू-वराच्या घरच्या मंडळीने लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. लग्नाची वेळ दुपारी असल्याने वधू-वरांचे नातेवाईक लग्नाच्या तयारीला लागले होते. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याने हा विवाह रोखण्यासाठी पाटोदा पोलिस वाघिर्याकडे रवाना झाले. याची खबर वºहाडी मंडळींना लागताच ते लग्न ठिकाणाहून निघून गेले. पाटोदा येथील जमादार आर.डी. आगे, जालिंदर शेळके, बदमा आर्सूळ, श्रीमती खरमाटे, नाईकनवरे यांनी उपस्थितांची चौकशी केली. पोलिस वेळीच गेल्यामुळे बाल विवाह रोखला गेला. सदरील ठिकाणाहून कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. त्यामुळे पाटोदा पोलिस ठाण्यात याची नोंद नव्हती. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होत असतील तर त्याची माहिती चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा समन्वयक तत्त्वशील कांबळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वाघिर्यात रोखला बालविवाह
By admin | Updated: May 15, 2014 00:05 IST