जळकोट : महाराष्ट्रावर निजामशहा, अदिलशहा यांनी आक्रमणे करुन पाहिली़ परंतु, या शहांना महाराष्ट्राने पळता भुई थोडी केली़ आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणे अमित शहा ठरविणार आहेत़ या मोदी, शहांचे तसेच हाल करुन गुजरात नव्हे तर महाराष्ट्र आपला मुख्यमंत्री निवडण्यास सक्षम असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन राकाँचे नेते आऱआऱ पाटील यांनी मंगळवारी जळकोट येथे केले़उदगीर मतदारसंघातील राकाँचे उमेदवार संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ जळकोट शहरात आऱ आऱ पाटील यांनी सभा घेतली़ या निवडणुकीत राष्ट्रवादीची स्पर्धा केवळ भाजपाशी असल्याचे सांगून आबांनी मोदींवर हल्लाबोल केला़ आमच्यावर सिंचन घोट्याळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपाने गुजरातमधील ६ हजार कोटींचा नर्मदा प्रकल्प ३८ हजार कोटींवर नेणाऱ्या सरकारवर का मूग गिळले, असा सवाल आबांनी केला़ भाजपाकडे प्रादेशिक नेतृत्वच नसल्याने मोदींना तालुकास्तरावर फिरावे लागत असल्याची खिल्लीही आबांनी उडविली़ महाराष्ट्राचा, शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार, धोरण राष्ट्रवादीकडेच असल्याने या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन आऱआऱ पाटील यांनी केले़ मंचावर रायुकाँचे उमेश पाटील, उमेदवार संजय बनसोडे, रामराव राठोड, चंदन पाटील, नवनाथ गायकवाड, भरत पाटील, राम हाडोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती़(वार्ताहर)
मुख्यमंत्री महाराष्ट्रच ठरवणार
By admin | Updated: October 8, 2014 00:51 IST