औरंगाबाद : ‘दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना, इकडे शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत असताना पंतप्रधानांनी भेट द्यायची गरज नाही, असे म्हणताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरम वाटायला पाहिजे होती. निवडणूक प्रचारासाठी नरेंद्र मोदींची दहा-दहा वेळा गरज पडते आणि आता जनता होरपळून निघत असताना ही अनास्था...’अशा तिखट शब्दात आज राज्यसभेच्या माजी सदस्या व माकप पॉलिट ब्युरोच्या सदस्या वृंदा कारत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर सिटू भवनात पत्रकारांशी वार्तालाप करीत होत्या. तत्पूर्वी त्यांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, माकप-भाकप विलीनीकरणापेक्षाही आम्ही डावे म्हणून एक पर्याय उभे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठवाड्यात टँकर आणि चारा लॉबी तयार झाली असून, मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप कारत यांनी केला. दुष्काळग्रस्तांच्या सोयी-सुविधांसाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नसल्याची तक्रारही त्यांनी केली. विभागीय आयुक्तांना वृंदा कारत यांच्यासमवेत कॉ. पी.एस. घाडगे, कॉ. भाऊसाहेब फिरपे, बी. पोटभरे व भुंबे होते.पत्रकार परिषदेस कॉ. पंडित मुंडे, कॉ. उद्धव भवलकर, कॉ, विठ्ठल मोरे, कॉ. योगेश खोसरे, कॉ. भगवान भोजने आदींची उपस्थिती होती.
दुष्काळाबाबत राज्याचे मुख्यमंत्री संवेदनाहीन
By admin | Updated: April 26, 2016 00:13 IST