उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या छाननीदरम्यान विद्यमान चेअरमन बापूराव पाटील, व्हा़चेअरमन संजय देशमुख, संचालक सुनिल चव्हाण यांच्यासह १२ सदस्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आले होते़ विद्यमान तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या आक्षेपावर सुनावणी झाली असून, बुधवारी याचा निकाल जाहीर होणार आहे़ छाननीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, उपाध्यक्ष संजय देशमुख विरूध्द राष्ट्रवादी युवकचे माजी कार्याध्यक्ष सतीश दंडनाईक यांनी एकमेकांवर आक्षेप नोंदविले़ छाननीदरम्यान १३ जणांचे अर्ज बाद झाल्याचे वृत्त असून, २२९ मंजूर करण्यात आल्याचे समजते़जिल्हा बँकेच्या १५ संचालक निवडीसाठी होवू घातलेल्या निवडणुकीचा आखाडा दिवसेंदिवस चांगलाच रंगत आहे़ निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या ८८९ मतदारांपैकी विद्यमान पदाधिकारी, आजी-माजी आमदारांसह शेकडो इच्छुकांनी २४७ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत़ दाखल नामनिर्देशनपत्रांची सोमवारी छाननी प्रक्रिया झाली़ या छाननी प्रक्रियेवेळी डीसीसीचे विद्यमान चेअरमन बापूराव पाटील यांना तीन आपत्य असल्याबाबत हर्षवर्धन चालुक्य यांनी आक्षेप घेतला होता़ चालुक्य यांनी आक्षेप घेताच पाटील यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी चालुक्य यांच्याशी शाब्दीक बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करीत आक्षेप घेण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे सांगितले़ तसेच बँकेचे विद्यमान व्हा़ चेअरमन संजय देशमुख हे जिल्हा बँकेच्या थकीत कर्जदाराचे जामीनदार असल्याबाबतचा आक्षेप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सतीश दंडनाईक यांनी घेतला होता़ तर आ़ मधुकरराव चव्हाण यांचे सुपूत्र तथा विद्यमान संचालक सुनिल चव्हाण हे श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत़ कारखाना बँकेचा थकीत कर्जदार असल्याने त्यांच्या नामनिर्देशनावर तामलवाडी येथील बलभीम लोंढे यांनी आक्षेप नोंदविला होता़ या तिन्ही आक्षेपावरच सर्वाधिक वेळ सुनावणी घेण्यात आली़ तिन्ही पदाधिकाऱ्यांवरच अर्ज नोंदविण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांची एकच धावपळ उडाली होती़ तर इतर मागासवर्गीय मतदार संघातील सात सदस्यांच्या संस्था क्रियाशील नसल्याचा आक्षेप त्र्यंबक कचरे यांनी घेतला होता़ यात डीसीसीचे विद्यमान संचालक महेबुब पाशा पटेल यांच्यासह युवराज नळे, नवनाथ राऊत, अविनाश फुलसुंदर, इस्माईल सौदागर, हरिश्चंद्र कुंभार, अनंत वाघमारे यांचा समावेश होता़ हा आक्षेप यावेळी फेटाळण्यात आला़ तर डीसीसीचे व्हाईस चेअरमन संजय देशमुख यांनी सतीश दंडनाईक व सुरेश देशमुख या दोघांच्या नामनिर्देशनपत्राविरूध्द आक्षेप नोंदविला होता़ या दोघांच्या संस्था आॅडीट वर्ग अ, ब मध्ये नाहीत, संचालक म्हणून त्यांना एक वर्षाचा अनुभव नसल्याचे नमूद करण्यात आले होते़ मात्र, हा आक्षेप फेटाळण्यात आला़ यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस़पी़बडे, बी़एऩवाघमारे, बी़बी़परमरकर यांनी काम पाहिले़ नामनिर्देशन पत्राची छाननी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेना- भाजपाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केली होती़(प्रतिनिधी)
चेअरमन, व्हा़चेअरमनसह संचालकही अडकले आक्षेपाच्या कचाट्यात
By admin | Updated: April 14, 2015 00:44 IST