औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) सक्तीची करण्यात आली आहे. मे-जून या महिन्यात प्रवेशपूर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.२०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेशपूर्व प्रक्रिया आणि वार्षिक वेळापत्रक या संदर्भात डॉ. चोपडे यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके, डॉ. सुहास मोराळे, डॉ. दिलीप खैरनार आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता व नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम यासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. यावर्षी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे ‘सीईटी’ च्या माध्यमातून होणार आहेत. विभागातील पदव्युत्तर विभागात १६ ते २२ मे दरम्यान ‘सीईटी’ ची नोंदणी होईल. २३ ते २८ मे या काळात विविध विभागांत ‘सीईटी’ होऊन ३० मे रोजी निकाल घोषित करण्यात येईल, तर जून महिन्यात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. विद्यापीठाचे वेळापत्रकही १५ जून २0१६ ते ३० एप्रिल २0१७ असे ठेवण्यात आले आहे. ३० जून रोजी सर्व विद्यार्थ्यांचा ‘स्वागत समारंभ’ घेण्यात येईल. यावेळी सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना कुलगुरू संबोधित करणार आहेत.
सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सीईटी
By admin | Updated: May 11, 2016 00:49 IST