जालना : राज्याचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षासाठी शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली. परंतु जिल्ह्यात अजूनही मागच्या वर्षीचे वृक्षलागवडीचे उदिष्ट पूर्ण झाले नाही, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ४० टक्केच खड्डे खोदले गेले आहे.ही योजना राबविण्यासाठी सामाजिक वनीकरण, ग्रामविकास विभाग, वन विभाग, कृषी विभाग व इतर विभागाचे संयुक्त प्रयत्न गरजेचे आहेत. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत असतहनासुद्धा जिल्ह्याचे ४ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, असे विदारक सत्य समोर आले आहे. आता पावसाळा सुरू झाला असला तरी खड्डे खोदण्याचे काम अद्यापही संपले नाही. त्यामुळे यावर्षीही ही योजना कागदावरच राहणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्व तालुक्यात वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम संथ गतीने चालू आहे. खड्डे खोदण्यापासून रोपवाटीका निर्मीती, रोपाची लागवड, रोपाच्या संगोपनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे; परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्याला दिलेले गतवर्षीचेही उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने नवीन उद्दिष्टाचे का होईल? असा प्रश्न निर्माण होत आहे. गतवर्षी कागदोपत्रीच रोपे लावण्यात आल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या महसूल विभागाला शासनाने कारणे दाखवा नोटिसा पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महसूल विभागाने या योजनेतून अंग काढून घेतले की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. नोटिसा बजावूनही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. वृक्ष संगोपनाच्या बाबतीत सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे ही योजना अजूनही यशस्वी ठरू शकली नाही. दरम्यान, खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत लागवड अधिकारी एम.डी कामकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तीन तालुक्यांत लागवडीला मुहूर्तच नाहीगेल्या वर्षी जिल्ह्याला ४ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, १६ हजार १५० एवढीच रोपे लावण्यात आली. ज्यामध्ये अंबड येथे १९०० रोपे, बदनापूर ६००० , जाफराबाद २२००, जालना २५००, मंठा ३४०० रोपे लावण्यात आली, उर्वरित तीन तालुक्यांनी एक रोपटेही लावले नाही. घनसावंगी, परतूर, भोकरदन या तालुक्यांना गतवर्षी दिलेले उद्दिष्टही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्याला १ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या जिल्ह्याने मागील वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने यंदा कमी उद्दिष्ट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शतकोटी वृक्षलागवड योजनेचा बट्याबोळ !
By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST