आळंद : सुमारे २५०० कोटी रुपये खर्चून औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. काही ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे. फुलंब्री तालुक्यातील आळंद ते खामगाव फाट्यादरम्यान वर्षभरापूर्वी झालेल्या सिमेंट रस्त्याला जागोजागी भेगा पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिमेंट रस्ता कामाच्या निकृष्ट दर्जामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या उत्कृष्ट कामाच्या गुणवत्तेलाच तडा जात असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद-अजिंठा-जळगाव हा रस्ता पूर्वी दोन पदरी व डांबरी होता. या महामार्गावर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने व रस्ता लहान असल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असे. त्यामुळे केंद्र सरकारने या राष्ट्रीय महामार्गात समावेश करून या रस्त्याचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाच्या कामासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन झाले होते. उद्घाटनप्रसंगी गडकरी यांनी महामार्गाचे काम हे गुणवत्तापूर्ण व्हावे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदारांना ताकीद दिली होती; परंतु सिमेंट रस्त्याच्या कामाला वर्षभरातच तडे गेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
---
260921\20210920_125708.jpg
औरंगाबाद-जळगाव सिमेंटी रस्त्याला जागोजागी मोठमोठ्या भेगा पडल्या आहे.