औरंगाबाद : देवीच्या विविध रूपांचा महिमा सांगणाऱ्या, आदिशक्तीचा जागर करून तिचा सन्मान करणाऱ्या नवरात्रोत्सवाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे. पवित्रता आणि प्रसन्नतेची उधळण करणारा हा उत्सव समस्त ‘स्त्री’ वर्गाचीच यशोगाथा वर्णन करणारा आहे. स्त्रीशक्तीचा ‘लोकमत’ने नेहमीच गौरव केला आहे. आता नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत’च्या वतीने खास स्त्रियांसाठी विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांसाठी असणारी भव्य सायकलिंग स्पर्धा हे कार्यक्रमाचे वेगळेपण असेल. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलिंगसारखा योग्य पर्याय महिलांनी निवडावा, हा सुप्त संदेशही या माध्यमातून देण्यात येत आहे. दि. ९ आॅक्टोबर रोजी ही स्पर्धा घेण्यात येईल. यासाठी औरंगाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेसाठी तीन वयोगट करण्यात आले आहेत. १० ते १५ वर्षे वयाच्या मुलींचा एक गट, १५ ते २५ वर्षांपर्यंतचा दुसरा गट तर २५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांचा तिसरा गट असणार आहे. या स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे दि. ७ आॅक्टोबर. प्रत्येक गटामध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे पारितोषिके दिली जातील. ‘बाईक रॅली’च्या माध्यमातून स्त्री शक्तीचे अनोखे रूप दाखविण्याचा प्रयत्नही या नवरात्रात होणार आहे. बाईक रॅलीचे आयोजनही दि. ९ आॅक्टोबररोजी करण्यात आलेआहे. यामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी दि. ५ आॅक्टोबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. गिअर असणारी बाईक, नॉन गिअर मोपेड आणि बुलेट अशा तीन प्रकारच्या बाईक घेऊन तरुणी व महिला या रॅलीत सहभागी होऊ शकतात. बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या आई व मुलगी या जोड्यांसाठी ‘मॉम अॅण्ड मी’ वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या थीमला साजेसा पेहराव करून येणाऱ्या आई व मुलगी यांच्या जोडीला आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.नवरात्रीचा खरा आनंद आहे, तो नवरंगात रंगून दांडिया खेळण्यात. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले आहे. चला तर मग.. एका नवीन उमेदीसह नवरात्रीच्या या विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज व्हा.
नवरात्रीनिमित्त महिलांना कार्यक्रमांची मेजवानी
By admin | Updated: September 28, 2016 00:38 IST