तुळजापूर : संबळ, तिमडी व बॅण्डपथकाच्या वाद्यात काळभैरवनाथ, आई राजाचा गजरात पारंपरिक पद्धतीने भेंडोळी उत्सव पार पडला. यावेळी भेंडोळीचे दर्शन घेण्यासाठी तुळजाभवानी मंदिरासह महाद्वार रोडवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.रविवारी अमावस्यादिवशी काळभैरवनाथचे तेल अभिषेक, श्रीफळ फोडणे, वड्याच्या माळा व नैवेद्य आदी विधी दिवसभर पार पडले. त्यानंतर भैरवनाथाचे पुजारी विश्वनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेंडोळीची बांधणी केली. त्यानंतर महंत मावजीनाथ यांच्या सनमतीनंतर मंदिर संस्थानतर्फे तहसीलदार सुजित नरहरे, दिलीप नाईकवाडी यांनी कालभैरवनाथाचे दर्शन घेऊन पोतने, भेंडोळी प्रज्वलित केली. भेंडोळी प्रज्वलित होताच महंत चिलोजी, महंत तुकोजी मठाद्वारे शिवाजी दरवाजातून श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात आली. मंदिरात श्री तुळजाभवानीच्या चरणी दर्शन घेऊन मंदिरास एक प्रदक्षिणा पूर्ण करून भेंडोळी महाद्वार रोडवरून कमानवेसमार्गे अहिल्यादेवी विहिरीत शांत करून विसर्जित करण्यात आली. यावेळी आर्य चौक, महाद्वार चौक, कमानवेस या ठिकाणी भाविकांनी, महिलांनी मोठी गर्दी केली होती. तत्पूर्वी दशावतार मठातील महंत मावजीनाथ यांचे सायंकाळी मंदिरात आगमन झाले. कल्लोळतीर्थ, गोमुख तीर्थ या ठिकाणी जाऊन महंतांनी चरण धुतले. त्यांच्यासमवेत महंत इच्छागिरी, तेजनाथ, गुलाबनाथ, रघुनाथ, सुरेंद्रनाथ, राकेशनाथ आदी नवनाथ सांप्रदयाचे महंत होते. भेंडोळीवेळी महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी, विश्वस्त अॅड. मंजुषा मगर, भोपी अध्यक्ष अमर परमेश्वर, सुधीर कदम, पुजारी मंडळाचे सुधीर रोचकरी, गोकुळ शिंदे, रावसाहेब शिंदे, विवेक शिंदे, सेवेकरी राजेंद्र गोंधळी, अनंतराव रसाळ, औटी, परेकर, छत्रे, चोपदार आदी उपस्थित होते. मंदिरात भेंडोळी येताच भाविकांनी पोत ओवाळणीसाठी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)
भेंडोळी उत्सव उत्साहात
By admin | Updated: October 31, 2016 00:33 IST