औरंगाबाद : औरंगाबाद विभागात सर्वाधिक उत्पादनाची निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला, तसेच नागपूर सीमाशुल्क आयुक्तालयाने आयसीडीसाठी विशेष सेवेची नोंद घेत सहाय्यक आयुक्त भारत गाडे यांना पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा केली.
केंद्रीय जीएसटी विभागात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनानिमित्त बुधवारी हा कार्यक्रम घेण्यात आला. अतिरिक्त महासंचालक संचालनालय जनरल सिस्टीम ॲण्ड डेटा व्यवस्थापक (चेन्नई ) के.व्ही. एस. सिंग, नीलिमा सिंग, सहाय्यक आयुक्त अमोल केत, सहआयुक्त एस. बी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपूर सीमाशुल्क आयुक्तालयाच्या वतीने औरंगाबाद विभागातून सर्वात अधिक उत्पादने निर्यात करणारे कास्मो फिल्म कंपनीचे नाव घोषित करण्यात आले. कंपनीचे महाव्यवस्थापक राजेश गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. आयसीडीसाठी सहाय्यक आयुक्त भारत गाडे यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.
सहायक संचालक, नॉकिन दीपक माता यांनी सांगितले की, २६ जानेवारी १९५३ रोजी ब्रुसेल्स, बेल्जियम येथे जागतिक सीमाशुल्क संघटनेची ( डब्ल्यूसीओ ) स्थापना करण्यात आली. तेव्हापासून २६ जानेवारीला जगातील १७९ देशांत आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन साजरा करण्यात येतो. भारतात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्याने २७ जानेवारीला आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन कार्यक्रम घेण्यात येतो.
के. व्ही. एस. सिंग यांनी औरंगाबादेतील सर्व निर्यातदार कंपन्या, लॉकडाऊन काळात सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी २४ तास काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आपल्या देशात तयार झालेली कोव्हिड लस विदेशात पोहोचविण्यासाठी सीमाशुल्क विभाग मोलाचे कार्य करत आहे. यामुळे दुसऱ्या देशानेही आपल्या देशातील सीमाशुल्क विभाग व भारत सरकारचे अभिनंदन केल्याचे त्यांनी नमूद केले. अधीक्षक उदय पांडव यांनी सूत्रसंचलन केले. अमोल केत यांनी आभार मानले.
चौकट
विमान कंपन्यांकडून मिळले नाही हमीपत्र
सहायक आयुक्त अमोल केत यांनी सांगितले की, चिकलठाणा येथील विमानतळावर एअर कार्गो सुरू करताना कस्टम आणि इमिग्रेशनची सोय असावी लागते. आमच्या विभागाने तिथे कार्यालय व अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. पण अजून विमान कंपन्यांनी आमच्याकडे हमीपत्र दिले नाही. जोपर्यंत हमीपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्हाला तेथे काम सुरू करता येत नाही. जालना येथील ड्रायपोर्टचे काम वर्षभरात पूर्ण होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.