ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील घरात मध्यरात्री अभियांत्रिकीचे पेपर लिहिताना सापडलेल्या २७ विद्यार्थ्यांप्रमाणेच अन्य २५ विद्यार्थ्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
नगरसेवक सुरे यांच्या घरात अभियांत्रिकीचे पेपर लिहिताना साई इन्स्टिट्यूटच्या २७ विद्यार्थ्यांना गुन्हेशाखेच्या पोलिसांनी १७ मेच्या रात्री छापा मारून रंगेहाथ पकडले होते. शिवाय नगरसेवक सीताराम सुरे, त्याचा मुलगा किरण सुरे, साई संस्थेचे अध्यक्ष अॅड. गंगाधर मुंढे, मंगेश मुंढे, प्राचार्य, दोन प्राध्यापक अशा एकूण ३३ जणांना अटक केली होती. या प्रकरणातील तीन मुलींसह चार जणांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केलेले आहे. उर्वरित आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. हर्सूल ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाविषयी माहिती देताना आयुक्त यादव म्हणाले की, प्रकरणाच्या तपासाला गुन्हेशाखेने वेग दिला आहे. घटनास्थळी उपस्थित नसलेल्या अन्य २५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचा अतिरिक्त गठ्ठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या २५ विद्यार्थ्यांना अटक केली जाईल. कुलगुरू डॉ. चोपडे आज सदिच्छा भेटीसाठी आले होते. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या चौकशीचा अहवाल ते पोलिसांना देणार आहेत. त्यांच्या अहवालात दोषी असलेल्या सर्वांना आम्ही अटक करणार आहोत. याशिवाय आमच्या तपासात दोषी आढळलेले आणि विद्यापीठाच्या अहवालात ज्यांची नावे नाहीत, अशा अधिकारी, कर्मचा-यांनाही आम्ही पकडणार आहोत. तपासामध्ये विद्यापीठाचा परीक्षेसंबंधी असलेला कायदा आणि नियमांची माहिती आमच्या अधिका-यांनी घेतली. विद्यापीठाच्या कायद्यानुसार परीक्षा संपल्यानंतर तात्काळ उत्तरपत्रिका परीक्षा विभागात जमा करणे संबंधित महाविद्यालयास बंधनक ारक आहे. या तात्काळचा अर्थ साई संस्थेने त्यांच्या सोयीनुसार घेतला आणि घोटाळा सुरू केला होता.
कुलगुरूंचे पोलिसांना सहकार्य-
पोलीस आयुक्त म्हणाले की, कुलगुरूंनी आजच्या भेटीमध्ये नगरसेवकाच्या घरी पेपर सोडविणाºया साई इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणातील सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी,यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे. .