नळदुर्ग : कॅनॉलला लागलेल्या गळतीमुळे नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी या दोनैपकी मादी धबधब्यातून गेल्या चार दिवसांपासून पाणी वाहू लागल्याचे दिसत आहे. मागील जून-जुलै महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने नर-मादी धबधबे ओसंडून वाहन होते. पंधरा दिवस चालणार्या या प्रवाहाचे रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. परंतु, आजरोजी या बोरी धरणात केवळ १०.७५ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा असून, दररोज कालव्यातून ०.११७२ दमी पाणी बाहेर पडत आहे. दहा किमी लांबीच्या या कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. नदीकाठावरून जाणार्या कालव्यातून गळती लागल्याने व झिरपलेले पाण किल्ल्यातील साठवण तलावात गेल्याने तलाव तुडूंब भरला आहे. तलाव भरल्यानंतर जास्तीचे पाणी नर-मादी धबधब्यातून वाहते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कमी उंचीवर असलेल्या मादी धबधब्यातून हे पाणी वाहत आहे. विजापूरच्या इब्राहीम आदिलशहाने १६६३ मध्ये येथील बोरी नदीवर किल्ल्यात धरण बांधलेले आहे. या धरणाचा बंधारा संपूर्ण दगडी आहे. १७४ मिटर लांब, अडीच ते चौदा मिटर रूंद व २९ मिटर उंच असणार्या या बंधार्याच्या पोटात अत्यंत हवेशीर जलमहल बांधण्यात आला आहे. या महालावर दोन्ही बाजुला सांडवे सोडलेले असून, त्यातून विसर्ग होणार्या पाण्याची पातळी कमी-जास्त करण्यात आली आहे. जेव्हा धरण भरून सांडव्यातून पाणी वाहते तेव्हा कमी उंचीच्या सांडव्यातून ते बाहेर पडते. यालाच मादी धबधबा म्हणतात. या कृत्रिम परंतु नैसर्गिकतेची झलक दाखविणार्या धबधब्याची उंची १९ मिटर आहे. पाटबंधारे विभागाकडून कॅनॉल दुरूस्तीवर दरवर्षी लाखो रूपये खर्च दाखविला जातो. सध्या कॅनॉलमधून सुटणारे पाणी शेतकर्यांपर्यंत पोहोंचत नाही. दरम्यान, याबाबत रखवालदार रमेश कांबळे म्हणाले, उन्हाळ्यात नर-मादी धबधब्याला पाणी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॅनॉलला लागलेल्या गळतीमुळे मादी धबधब्यातून गेल्या चार दिवसापासून पाणी पडत आहे. (वार्ताहर)
कॅनॉल गळतीमुळे धबधबा वाहू लागला
By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST