औरंगाबाद : जगविख्यात औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी छताचे प्लास्टर उखडले असून, पावसामुळे बसस्थानकाला गळती लागली आहे. बसस्थानकाचे छत आणि भिंतीमधून पाणी झिरपत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानकाची ही अवस्था पाहून प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. एस. टी. महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न देणाऱ्या या बसस्थानकाच्या इमारतीची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली आहे. बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर ठिकठिकाणी उखडल्याचे दिसते. यापूर्वी छताचे प्लास्टर प्रवाशांच्या अंगावर पडल्याची घटना घडली आहे. आता पावसामुळे बसस्थानकाची दुरवस्था आणखी समोर येत आहे. जागोजागी गळती लागली असून, बसस्थानकातील खांब आणि भिंतीमध्ये पाणी झिरपत आहे. पर्यटननगरीतील बसस्थानकाची अवस्था पाहून प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी बसस्थानकावर मल्टिकॉम्प्लेक्स इमारत तयार करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील १३ शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्याचे जाहीर करण्यात आले. या शहरांमध्ये मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबाद शहराचा समावेश आहे. त्यामुळे अद्ययावत बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.