सुनील कच्छवे, साहेबराव हिवराळे , औरंगाबाद औद्योगिक विकासाच्या वेगामुळे शेंद्रा औद्योगिक परिसरात घरांची गरज वाढली आहे. शिवाय शहराजवळ असल्याने अनेक लोक या भागात गुंतवणूक म्हणून प्लॉटची खरेदी करीत आहेत. म्हणूनच गेल्या काही दिवसांत अनेक बिल्डर्स शेंद्रा परिसराकडे वळले आहेत. औरंगाबादचा विस्तार चारही दिशांनी झपाट्याने होत आहे. त्यातच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर (डीएमआयसी) प्रकल्पामुळे शेंद्रा एमआयडीसी परिसराला आणखी महत्त्व आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एमआयडीसीलगतच्या शेंद्रा जहांगीर, शेंद्रा बन, गंगापूर जहांगीर, वरुड काझी, कुंभेफळ, लाडगाव, करमाड, टोणगाव आणि हिवरा या गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या सर्व गोष्टी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून शहरातील बिल्डर्सही या भागाकडे मोठ्या संख्येने वळले आहेत. क्रेडाईचे अध्यक्ष पापालाल गोयल यांनी सांगितले की, विकासासाठी शेंद्रा परिसरात भरपूर वाव निर्माण झाला आहे. लोकांकडून या भागात प्लॉट आणि घरांना चांगली मागणी आहे. इन्व्हेस्टर क्लासही इकडे वळला आहे. या भागात सध्या वेगवेगळ्या बिल्डर्सचे शंभरपेक्षा जास्त प्रकल्प सुरू आहेत. एनएसाठी चारशे शिफारशी 1 शेंद्रा औद्योगिक परिसराच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अकृषक परवानग्या घेण्यात येत आहेत. निवासी वापरासाठी जमिनीचा वापर करता यावा यासाठी अशी परवानगी आवश्यक असते. 2 ही परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिली जाते. शेंद्रा परिसरातून असे अनेक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत. 3 अकृषक परवाना घेण्यासाठी आधी नगररचना विभागाकडे लेआऊट सादर करावे लागते. हे लेआऊट तपासून नगररचना विभाग अकृषक परवाना देण्यासंदर्भात शिफारस करतो. 4 चालू वर्षी शेंद्रा परिसरातील जमिनींच्या एनएसंदर्भात जवळपास चारशे शिफारशी केल्या असल्याचे नगररचना विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पाण्याचे नियोजन नाही... शहरातील नागरिकांनाच अपुरा पाणीपुरवठा होत असून, पाण्यासाठी सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे. अशा परिस्थितीत तब्बल नऊ गावे विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाचा ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असला तरी मुळात पाणी ही सर्वांत मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ नागरिक लिंबाजी बागल यांनी नमूद केले. भूमिहीन म्हणून विरोध करणार गावातील जमिनी हिरावून घेतल्या जात असून, चांगल्या शेतीयोग्य जमिनींवर कारखाने, घरे उभारण्यात येतील. अख्खे गाव भूमिहीन होणार असल्याने आता शेतकर्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. ९ गावांतील लोकांना एकत्र करून विरोधाचा लढा आम्ही उभारणार असल्याचे सरपंच पंढरीनाथ धाडगे यांनी सांगितले.
शेंद्रा परिसराकडे बिल्डर्सचा वाढता ओढा
By admin | Updated: May 8, 2014 00:31 IST