छत्रपती संभाजीनगर : चाक फुटल्याने बोअरवेलची गाडी उलटून रस्त्याच्या बाजूस खोलात जाऊन कोसळली. यात बोअरवेलचे जड पाईप अंगावर पडल्याने दोन परराज्यातील लच्छा कृष्णा संता (५५) व बोंदु संता (२८, दोघे मुळ रा. ओडिशा) या कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. बुधवारी सकाळी ९.३० वाजता झाल्टा फाटा केंब्रिज चौक दरम्यान भिमवाडी परिसरात हा अपघात झाला.
लच्छा व बोंदु काही महिन्यांपुर्वी बोअरवेलच्या कामासाठी शहरात स्थायिक झाले होते. एकता बोअरवेलतर्फे बुधवारी ते अन्य सहकाऱ्यांसह बोअरवेलच्या गाडीवरुन झाल्टा फाट्याकडून केंब्रिज चौकाच्या दिशेने जात होते. या दरम्यान भिमवाडी परिसरात अचानक चाक फुटल्याने नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या बाजूच्या खाेल भागात जाऊन कोसळली. गाडीत चालकासह अन्य पाच कामगार होते. यात तीन कामगार गंभीर जखमी झाले. तर पाईप, अन्य अवजड साहित्य अंगावर पडून लच्छा व बोंदु जागीच मृत्यमूखी पडले.
घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडकोचे प्रभारी पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक फौजदार सतिश जोगस यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत कामगारांच्या कुटुंबांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता. सहायक फौजदार सतिश जोगस अधिक तपास करत आहेत.