मोहन बोराडे, सेलूनगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ़ रामप्रसाद बोर्डीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यात मनोमिलन झाले असून, दोन्ही गटाचे नगरसेवक एकत्र आले असल्याची माहिती मिळाली आहे़ यामुळे नवीन राजकीय समीकरणासह नगरपालिकेतील सत्ता संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे़ नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदासाठी विनोद बोराडे यांना डावलून आ़ रामप्रसाद बोर्डीकर गटाने शिवसेनेशी हातमिळवणी करीत पवन आडळकर यांना नगराध्यक्ष केले होते़ त्यानंतर आ़ रामप्रसाद बोर्डीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यात नेहमीच दुरावा पहायला मिळाला होता़ आगामी अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवडणूक ११ जुलै रोजी होत आहे़ यासाठी बहुमत एकत्र करण्यासाठी दोन्ही गटांकडून जबरदस्त तयारी सुरू होती़ मात्र अचानक आ़ रामप्रसाद बोर्डीकर व विनोद बोराडे यांच्यात चर्चा होऊन दोन्ही गट एकत्र आले आल्यामुळे नगरसेवकांच्या घोडेबाजाराला पूर्णविराम मिळाला आहे़ नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष करण्यासाठी ११ मतांची गरज आहे़ काँग्रेसकडे १५ नगरसेवक आहेत़ यापूर्वी बोर्डीकर गटाकडे १० तर बोराडे गटाकडे पाच नगरसेवक विभागले गेले होते़ त्यामुळे नगराध्यक्ष होण्यासाठी बोर्डीकर गटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची गरज होती तर विनोद बोराडे गटाला शिवसेनेचा पाठींबा आवश्यक होता़ यामुळे नगरसेवकांना महत्त्व प्राप्त झाले होते़ प्रत्येक मतासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी व मनधरणी करण्याची वेळ आली होती़ परंतु, अचानक शनिवारच्या रात्री आ़ रामप्रसाद बोर्डीकर व विनोद बोराडे यांची बैठक होऊन निवडणूक संदर्भात चर्चा झाली़ त्यामध्ये विनोद बोराडे यांनी कुठलीही शर्थ व अट न ठेवता आपल्या गटाचे नगरसेवक आ़ रामप्रसाद बोर्डीकर गटाच्या उमेदवारास पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे़ नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असल्यामुळे आ़ रामप्रसाद बोर्डीकर गटाकडून गटनेते सुरेश कोरडे व विमलबाई तरटे यांच्यातील एकाचे नाव निश्चित करण्यात येणार आहे़ सोमवारी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवाससस्थानी त्यांच्या गटाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन उमेदवाराबाबत चर्चा केली आहे़ शेवटी आ़ बोर्डीकर मंगळवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची नावे निश्चित करणार असल्याची माहिती आहे़सुरेश कोरडे, विमल तरटे यांच्यात चुरस नगराध्यक्षपदासाठी गटनेते सुरेश कोरडे व विमलबाई तरटे यांच्यात रस्सीखेच होताना दिसत आहे़ हे दोन्ही नगरसेवक आ़ बोर्डीकर गटाचे आहेत़ सोमवारी आ़ बोर्डीकर यांनी नगरसेवकांशी चर्चाही केली़ परंतु, नाव निश्चित झाले नव्हते़ मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाव निश्चित केले जाणार आहे़ दरम्यान उपनगराध्यक्षपद विनोद बोराडे यांच्या गटाला मिळणार असल्याची चर्चाही होती़ परंतु, या बाबत सर्व निर्णय आ़ रामप्रसाद बोर्डीकर घेणार असून, त्यांच्या गटाकडून मुश्ताक अहेमद तर बोराडे गटाकडून वहीद अन्सारी यांच्या पत्नी यांना ऐनवेळी उमेदवार केले जाऊ शकते़ आ़ बोर्डीकरांनी शेवटच्या क्षणी मास्टरस्ट्रोक मारला आहे़काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे मागच्या वेळी शिवसेनेला उपनगराध्यक्षपद मिळाले होते़ परंतु, यावेळी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे शिवसेनेला फारसे महत्त्व राहिलेले नाही़ आगामी विधानसभेची तयारी आ़ बोर्डीकर यांनी सुरू केली असून, उपनगराध्यक्षपदी मुस्लीम उमेदवार देऊन मुस्लीम मते आपल्याकडे खेचण्याची त्यांची व्यूहरचना आहे़नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन्ही गटात दिलजमाई झाल्यामुळे घोडेबाजारीला पूर्णविराम मिळाला आहे़ मुदत संपल्यानंतर काही नगरसेवक सहलीवरही गेले होते़ त्यामुळे घोडेबाजार तेजीत आला होता़ मात्र दोन्ही गट एकत्र आल्यामुळे दोन्ही पदे काँग्रेस नगरसेवकाला मिळणार हे निश्चित आहे़ मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत नगराध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा अर्ज स्वीकारला जाणार आहे़
बोर्डीकर, बोराडेंचे झाले मनोमिलन..!
By admin | Updated: July 8, 2014 00:33 IST