ज्ञानेश्वर वाघ
घोसला : सोयगाव तालुक्यात बोंडअळींच्या प्रादुर्भावामुळे २३५७८ हेक्टरवरील कपाशी पिकांची राखरांगोळी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून स्वप्नांवर पाणी फेरले.
सोयगाव तालुक्यात कापसाची सर्वाधिक लागवड करण्यात येते. यावर्षी २९ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी खते, औषधी असा खर्चही मोठा केला. मात्र, अतिपावसाने कापूस पिकाला मोठा दणका बसला. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आशा सोडली नव्हती. मात्र, बोंडअळीचे संकट कोसळल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. महागडे औषध फवारूनही बोंडअळी आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी २३५७८ हेक्टर क्षेत्रांवरील कापूस पीक किमान रबी पीकतरी घेता येईल, या उद्देशाने उपटून टाकले तसेच जाळूनही टाकले.
चौकट
साधा अहवालही नाही
दिवाळीआधीच दुसऱ्याच वेचणीत सोयगाव तालुक्यात सप्टेंबरअखेरीस बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर कृषी आणि महसूल विभागाकडून जिल्हा प्रशासनाला साधा अहवालही पाठविण्याची तसदी अधिकाऱ्यांनी घेतली नाही. यामुळे जिल्हा प्रशासन बोंडअळीच्या कहरापासून अद्यापही अनभिज्ञ आहे. कृषी विभागाने केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण केले. महसूलच्या पंचनाम्यांची प्रतीक्षा कृषी विभागाला होती. तर कृषी विभागाच्या पाहणी अहवालाची महसूलला प्रतीक्षा होती. दोघांच्या समन्वयाअभावी पंचनामे रखडले.
छायाचित्र ओळ : घोसला परिसरात बोंडअळीची बाधा झालेली कपाशी पेटवून देताना शेतकरी.