सावखेडा : शेंदुरवादा परिसरातील धामोरी बु. येथील मुक्तेश्वर शुगर मिलच्या सातव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ गुरुवारी सकाळी ऊस उत्पादक शेतकरी बापू भडके व विठ्ठल हाडोळे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. यावेळी या मिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब पटारे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, सहा वर्षांच्या कालावधीत इतर कारखान्यांच्या तुलनेत शासनाच्या एफआरपीनुसारच शेतकऱ्यांना पैसे दिले. योग्य भाव, योग्य वजन हे धोरण कारखान्याने स्वीकारले आहे.साखर उद्योगाला शासकीय धोरण हे पूरक व प्रोत्साहनपर नसल्याने कारखानदार व शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. मागील वर्षाच्या दुष्काळाने यंदा उसाचे क्षेत्र कमी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने भाऊगर्दी करून या परिसरातील शेतकऱ्यांना आमिष दाखवून ऊस देण्याचे आवाहन करतील; परंतु स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमिषाला बळी न पडता आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानतंर या मिलचे संचालक रामचंद्र निरपळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमासाठी शिवाजी जंजिरे, सूर्यभान मगर, नंदकुमार कुंजर, धामोरी सोसायटी चेअरमन तुकाराम शेळके, विनायक शेळके, गंगापूर कारखान्याचे संचालक कल्याण सुकासे, बाबासाहेब सुकासे, कांता गवांदे, गणेश वल्ले, सखाराम मोरे, भगवान विधाटे, अशोक होरकटे, शेषराव काजाळे आदींसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अभियंता अडकिणे यांनी मानले.
‘मुक्तेश्वर’चे बॉयलर अग्निप्रदीपन
By admin | Updated: October 29, 2016 00:59 IST