छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील हॉटेल अजंता ॲम्बेसिडरच्या जलतरण तलावात १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. गुरुवारी रात्री ९:३० वाजता ही घटना उघडकीस आली. नागेश रामेश्वर शेळके असे मृत मुलाचे नाव आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील असलेला नागेश महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. गुरुवारी तो हॉटेल अजंता ॲम्बेसिडर येथे कुटुंबासह नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो अचानक हॉटेलच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरला. रात्रीची वेळ असल्याने तलावाकडे कोणाचे लक्ष नव्हते. ८:३० ते नऊ वाजण्याच्या सुमारास मात्र नागेश पाण्यात बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, नऊ वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट असून, शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण समोर येईल, असे सिडको पोलिसांनी सांगितले.