सिडको वाळूजमहानगर परिसरातील एका पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या मैदानावरील झुडपात सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी तरुण बेशुद्ध पडलेला नागरिकांना दिसून आला. या परिसरातील नागरिकांनी ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देताच उपनिरीक्षक सतीश पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी झाडा-झुडपांत बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या त्या अनोळखी तरुणास पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान, मृत अनोळखी तरुणाच्या शरीरावर जुन्या जखमाचे वर्ण, तसेच गळ्या व खांद्याजवळ जखमा होत्या. मृताच्या छातीवर शिरीन हे नाव गोंदलेले होते. घटनास्थळाजवळ मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी कुठलाही पुरावा पोलिसांना मिळून आला नव्हता.
मृत तरुण निघाला कन्नडचा
पोलीस निरीक्षक मधुकर सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहर व ग्रामीण भागातून बेपत्ता असलेल्यांची माहिती गोळा केली. सिटी चौक पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या तरुणाचे वर्णन मृताशी मिळते-जुळते असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी कन्नडला संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. शासकीय रुग्णालयात आल्यानंतर शेख शकील याने मृत अनोळखी तरुणाचे नाव शेख जफर शेख भिकन (वय ३५ रा. शनिमंदिराजवळ, कन्नड ) असल्याचे सांगितले. मृत शेख जफर हा काही दिवसांपूर्वी औरंगाबादला नातेवाइकाला भेटण्यासाठी आल्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे नातेवाइकांनी सांगत याविषयी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले. दरम्यान, शेख जफर याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली याविषयी गुढ कायम आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.
फोटो क्रमांक-शेख जफर (मयत)
-----------------------