रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यातील नायगाव येथील इंजिनिअर असलेल्या तरुणाने विधी, परंपरागत विधीला फाटा देत लग्नाच्या आदल्या दिवशी देवकार्याला अन्नदान करण्याऐवजी रक्तदान शिबिर घेत नवीन पायंडा पाडला. कोरोना काळात गरजवंत रुग्णांना मदत करण्याचा हेतू समोर ठेवून हा कौतुकास्पद निर्णय नवरदेवाने घेत स्वत:सह कुटुंबातील एकूण १८ सदस्यांनी रक्तदान केले. व्यवसायाने इंजिनिअर असलेला हा तरुण थाटमाट बाजूला ठेवून मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे.
नायगावच्या किरण गायकवाड यांचा कन्नड तालुक्यातील वासडी येथील संजीवनी निकम यांच्याशी विवाह जुळला आहे. या दोघांनी एकदम साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले असून, पारंपरिक वैवाहिक विधीला फाटा देत ना वऱ्हाड, डीजे, पंगत, मिरवणुकी, कुंकू, हळदी, ना देवकार्य. त्यांनी अनेक रूढी परंपरांसह धार्मिक कार्यक्रमाला फाटा देत नवीन पायंडा पाडला आहे. यात बुधवारी (दि.२१) नायगावात किरण गायकवाडने घरासमोरच रक्तदान शिबिर घेत अनोखा पायंडा पाडला. यात त्यांच्यासह कुटुंबातील १८ सदस्यांनी रक्तदान केले. गुरुवारी (दि.२२) सुद्धा अत्यंत सध्या पद्धतीने विवाह होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
----- कोट ------
कोरोना काळात नागरिकांवर अनेक संकटे आली आहेत. बहुतांश ठिकाणी रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांसह नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न माझ्या माध्यमातून करण्यात आला असून, इतरांनीसुद्धा असे उपक्रम हाती घ्यावेत. - किरण गायकवाड, नवरदेव
------------
कॅप्शन : नायगावात नवरदेवाच्या घरासमोर घेण्यात आलेले रक्तदान शिबिर.
210421\raktdan naygav_1.jpg
रक्तदान