अधिकृत दर नावाचेच : अनधिकृत भाव ५२ हजारांपर्यंतप्रशांत हेलोंडे वर्धापंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या ५००, १००० च्या नोटाबंदीमुळे खोऱ्याने पैसा असलेल्या व्यापारी, उद्योगपती, राजकारणी, बडे अधिकारी आणि सराफांचीही चांगलीच गोची झाली आहे. सराफांना आपलाच ‘अन-अकाऊंटेड मनी’ ‘अकाऊंटेड’ करायचा आहे तर उर्वरित बड्या आसामींनाही घरात दडून असलेल्या ५००, १००० च्या नोटांचा उपयोग करायचा आहे. यासाठी मग विविध मार्ग अवलंबिले जात आहे. सध्या बड्या आसामींचा कुठल्याही भावात सोने खरेदी करून काळ्या पैशाचा बंदोबस्त करण्याकडे कल दिसून येत आहे. यामुळे ८ नोव्हेंबरपासून सोने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठीच तेजी आली असून अनधिकृत भाव ५२ हजारांवर पोहोचले आहेत. सोन्या, चांदीचे अधिकृत दर शेअर मार्केटवर अवलंबून असतात. हे भाव दररोज बदलत असतात. आज २८ हजार तर दुसऱ्या दिवशी ते ३० हजारांवर पोहोचतात. चांदीचे भावही ४८ हजारांपर्यंत पोहोचले आहे. सराफांच्या बंदनंतर सोन्याचे भाव सातत्याने वाढतच आहेत. बंद पूर्वी २६ ते २८ हजार रुपये असलेले सोने संप संपताच ३० ते ३२ हजार रुपयांवर पोहोचले. यातच ५००, १००० च्या चलनातून बाद झालेल्या नोटांनी अधिकची भर घातली आहे. परिणामी, सोने खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये प्रचंड ओढताण होत असल्याचे दिसून येत आहे. आजही सोन्याचे अधिकृत भाव ३४ हजार ५०० रुपये असल्याचे सांगितले जात आहेत; पण त्यासाठी धनादेश वा नवीन नोटांनी व्यवहार करणे बंधनकारक आहे. असे असले तरी लग्नसराई असल्याने गरजुंना सोन्या, चांदीची खरेदी करावी लागत आहे. मग, कुठे उधारीवर, कुठे धनादेश देऊन तर कुठे गरजेपेक्षा कमी सोने घेऊन नवीन नोटांनी व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. काही सराफा जुन्या ५००, १००० च्या नोटा स्वीकारतच नाहीत तर काही सर्रास जुन्या नोटांवर व्यवहार करताना दिसतात; पण त्यासाठी वेगळे भाव दिले जात असल्याचे सराफा बाजारात फेरफटका मारला असता लक्षात आले. सोन्याचे अधिकृत भाव ३४ हजार ५०० रुपये असले तरी बाजारात ४८ ते ५२ हजार रुपये प्रती तोळा सोने विकले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत अधिकृत दर सांगणाऱ्या सराफांचीही यामुळे गोची झाली आहे. परिणामी, अधिकृत आणि अनधिकृत, असे कुठलेही भाव सांगितले जात नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहक पाहून सध्या सोन्याचे भाव ठरत असल्याचे वास्तव आहे. सोने खरेदीतून बडे आसामी आपला काळा पैसा व्हाईट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही पाहावयास मिळत आहे. या बड्या आसामींमुळेच सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठीच तेजी आल्याचे सांगितले जात आहे. लहान शहरांमध्ये हा प्रकार अधिक प्रमाणात होत नसला तरी जिल्हास्थळे वा मोठ्या शहरांमध्ये ५००, १००० च्या नोटा घेऊन ५० हजार रुपयांपेक्षा अधिक दराने सोन्याची विक्री होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. यामुळे काळा पैसा पांढरा करण्याचे हे माध्यम धनिकांनी निवडल्याचेच दिसून येत आहे.शासनाच्या निर्बंधात कोण अडकणार ?पंतप्रधानांच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव वधारले. मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी-विक्री होऊ लागली. यातून काळा पैसा पांढरा होत असल्याचे लक्षात येताच केंद्र शासनाने यावरही निर्बंध लादले आहेत. सराफा व्यावसायिकांना त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचा ‘स्टॉक रेकॉर्ड’ ठेवावा लागणार आहे. किती दराने किती सोने विकले, कुणी ते विकत घेतले याचीही माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी दुकानाचे सीसीटीव्ही फुटेजही शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. आता शासनाने लादलेल्या या निर्बंधांमध्ये कोण अडकणार, याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.सामान्यांची मात्र गोची५००, १००० च्या नोटा बदलून देण्याच्या धोरणामध्येही सातत्याने बदल होत आहे. एटीएममधून विड्रॉल दोन हजारांवरून अडीच हजार केले. ४ हजार ५०० रुपयांपर्यंत नोटाही बदलून दिल्या जात आहेत; पण १० ते २४ नोव्हेंबरपर्यंत केवळ एकदाच नोटा बदलून मिळतील, हे निर्बंध घातले आहेत. यामुळे एखाद्याला आजच पाच हजारांचे काम असेल आणि त्याने यापूर्वी नोटा बदलल्या असतील तर पैसे आणावे कुठून, हा प्रश्नच आहे. आठ दिवस लोटले असताना बँका, एटीएम समोरील सामान्यांची रांग काही केल्या कमी होत नाही. दैनंदिन व्यवहारांना सर्वाधिक फटका बसला आहे. घरखर्चालाही पैसे नसल्याने अनेक जण दोन-दोन दिवस बँक, एटीएमच्या रांगेत दिसून येतो. यावर त्वरित उपाययोजना करणे अगत्याचे झाले आहे.
सोने खरेदीतही गुंतलाय काळा पैसा
By admin | Updated: November 17, 2016 00:45 IST