लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या इतिहासात शेतकऱ्यांनी संप केलेला कधी पाहिला का? मात्र, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही वेळ आली. सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे, हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी येथील अग्रसेन भवनमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, अॅड. जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, प्रदीप सोळुंके, संग्राम कोते पाटील, शंकरअण्णा धोंडगे, ईश्वर बाळबुधे, सुहास तेंडूलकर, शिवाजीराव पाटील, अ.गफ्फार, डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, की भाजप सरकार सर्वसामान्यांसह शेतकरी, शिक्षक, युवकांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालास योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला. तेंव्हा सरकारने १९ आमदारांना निलंबित केले. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या मुद्यावर भाजप सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. उत्तर प्रदेशात योगी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात कर्जमाफी दिली. आपले डबल ग्रॅज्युएट मुख्यमंत्री अभ्यास सुरू असल्याचे सांगत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी आॅक्टोबरमध्ये मुहूर्त पाहून देणार का? सरकारच्या असंवेदनशील भूमिकेमुळे शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत. मेरा भाषण, मेरा शासन अािण जाहिरात बाजीवर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. कर्जमाफी झालेली नसताना जाहिराती कशा लावताय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी देशभरातील शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी त्यांनी केली. केवळ लेटरहेड छापण्यासाठी तुम्ही पदाधिकारी झाला नाहीत. जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्या लोकांची बेरीज करा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा, असा सल्ला पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रदेशाध्यक्ष तटके म्हणाले, की बळीराजाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतमालास हमी भाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. युवकांनी राष्ट्रवादीची भूमिका सोशल मीडियातून प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन तटकरे यांनी केले. आ.टोपे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. पक्षाचे सर्व सेल सशक्त करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असेही टोपे म्हणाले. मेळाव्यास राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भाजप सरकार शेतकरीविरोधी
By admin | Updated: June 12, 2017 00:24 IST