औरंगाबाद : महानगरपालिकेच्या वार्ड ‘फ’ कार्यालयामार्फत एकाच बाळाचे दोन वेगवेगळ्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.शहराच्या हद्दीत जन्म-मृत्यूच्या नोंदीचे काम महानगरपालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये होते. तेथूनच ही प्रमाणपत्रेही दिली जातात. परंतु मनपाच्या वॉर्ड ‘फ’ कार्यालयातून एका बाळाचे दोन वेगवेगळ्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेल्याची बाब समोर आली आहे. दिलीप देवरे यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांत ही बाब समोर आली. त्यानंतर जाग्या झालेल्या मनपाच्या आरोग्य विभागाने तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तिघांनाही तीन दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून या मुदतीत खुलासा आलेला नाही. त्यामुळे आता या तिघांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बाळाचा जन्म हा एका खाजगी रुग्णालयात झालेला आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयामार्फत जन्म नोंदणी अहवाल मनपाला प्राप्त झाला. त्यावरील नोंदणीनुसार आधी पार्थ नावाने एक जन्म प्रमाणपत्र दिले गेले. त्यानंतर याच नोंदणी क्रमांकाच्या आधारे काही दिवसांनी आदित्य नावाने दुसरे जन्म प्रमाणपत्र दिले गेले. अधिनियम १९६९ अन्वये नाव बदलता येत नाही. ते बदलावयाचे असेल तर विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. परंतु वॉर्ड ‘फ’ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून हे प्रमाणपत्र जारी केले. हा गंभीर गुन्हा असल्याचे निदर्शनास येताच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.