इंडसइंड बँक, सीईआरई, जलसंपदा विभाग आणि प्रयास युथ फाउंडेशन यांच्या प्रयत्नांनी जलसंपदा कार्यालयाच्या परिसरात पक्षितीर्थ तयार करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाच्या परिसरात मियावाकी पद्धतीने मागील चार वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात येत आहे. या परिसरातील झाडांची आता उत्तम वाढ झाली असून, या ठिकाणी गेल्यावर एखाद्या गर्द वनराईत आल्याचा भास होतो.
याच ठिकाणचा काही भाग पक्षितीर्थ म्हणून पक्ष्यांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. ५० पेक्षाही अधिक देशी जातींची १२०० झाडे याठिकाणी वाढविण्यात आली आहेत. सिमेंटचे वाढते जंगल, वृक्षतोड, प्रदूषण यामुळे हळूहळू पक्षी जणू शहरातून काढता पाय घेत आहेत. त्यामुळेच पक्षी संवर्धनासाठी हे विशेेष पाऊल उचलण्यात आल्याचे प्रयासचे रवी चौधरी यांनी सांगितले. याठिकाणी पक्ष्यांना राहायला लाकडी घरटे, थंड पाण्यासाठी लोखंडी स्टँडवर बसविण्यात आलेल्या मातीच्या कुंड्या, छोटे कारंजे, पाणवठा अशा सर्वच गोष्टी तयार केल्या आहेत. काही स्वयंसेवक पक्ष्यांसाठी येथे दाणे ठेवून जातात, तर काही अन्नपदार्थ पाखरांना पक्षितीर्थातूनच मिळतात.
चिमण्यांसोबतच हळद्या, धनेश, तांबट, जांभळा सूर्यपक्षी, शिक्रा असे दुर्मीळ पक्षीदेखील पक्षितीर्थमध्ये पाहायला मिळतात. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता वैजिनाथ गलांडे, रावसाहेब कानडे, ज्ञानेश्वर बोंद्रे, नामदेव चंदिले तसेच प्रयासच्या शिल्पा बाबरे, लक्ष्मण हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू असून जयदेव सोनवणे, राजेंद्र जाधव, हरी नागे, जयेश पवार, सचिन दराडे व इतर स्वयंसेवक यांचाही यात सहभाग आहे.