वैजापूर : रामकृष्ण-गोदावरी उपसा सिंचन योजना, मन्याड साठवण तलाव, नांदूर-मधमेश्वर जलदगती कालवा व टाकळीचा प्रकल्प, असे चार प्रकल्प झाले. त्यावर शासनाने कोट्यवधींचा खर्च केला; पण वैजापूर तालुक्याच्या पाचविला पुजलेला दुष्काळ काही हटला नाही. पुढाऱ्यांची वाढलेली गुत्तेदारीही याला कारणीभूत असल्याचा आरोप करीत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकल्प ताब्यात घेऊन चालविण्यासाठी साकडे घातले असून, काही अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीचीही त्यांनी मागणी केली आहे. रामकृष्ण-गोदावरी उपसा सिंचन योजना २० वर्षांपूर्वी पूर्ण झाली. ७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या या योजनेचा लाभ २३ गावांना होतो; मात्र ही योजना १५ वर्षांपासून किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहे. या योजनेचे मूळ कर्ज ३५ कोटींच्या जवळपास असून जिल्हा बँकेचे १४० कोटी व्याजासहत देणे आहे. यापैकी ७५ कोटी व्याज माफ करण्याचा ठराव बँकेने घेतला असून तो शासनाला पाठवला आहे. ही योजना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे; मात्र आता शासनाने योजनेचे कर्ज माफ करून ही योजना स्वत: चालवावी किंवा वैजापूर एमआयडीसीच्या ताब्यात दिली पाहिजे. मन्याड साठवण तलावाचा कॅचमेंट एरिया मोठा आहे. डोंगरदरीत हा तलाव आहे, त्यामुळे यात बाराही महिने पाणी असते. डोंगरदरीत तलाव असल्याने याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. या तलावाची उंची वाढविल्यावर जास्त पाणी उपलब्ध होईल, शिवाय खंडाळा, शिऊर, आघूर या जि.प. गटातील जवळपास १०० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. दहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. वैजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटू शकतो. या पाण्यावर लहान क्षमतेचा जलविद्युत प्रकल्पही उभा राहू शकतो, असे जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. ‘नांमका’च्या तर चार पोटचाऱ्यांची कामे रखडल्याने त्याचा असून काहीच उपयोग होत नाही. ६० टक्के पाणी वाया जाते, त्यामुळे पोटचाऱ्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वैजापूर तालुक्यातील या योजनांसह टाकळीचा कालवा आणि त्यावरील चाऱ्यांचे काम झाले पाहिजे. या कामचे टेंडर झालेले आहे. मात्र, कंत्राटदार काम करीत नाही. हा कालवा झाल्यास पोखरी, गारज, पाथ्री आदींसह परिसरातील गावांना लाभ होतो. तसेच, खारी खामगावच्या प्रकल्पाचे २० वर्षांपासून सांडव्याचे काम रखडल्याने पाणी साठवण होत नाही. प्रकल्पांवर आतापर्यंत मोठा खर्च झालेला आहे. मात्र, किरकोळ खर्चांसाठी या योजना पडून आहेत. त्याचा लाभ तालुक्याला होत नाही. -एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजपा
कोट्यवधींचा खर्च; पण दुष्काळ तसाच
By admin | Updated: December 7, 2014 00:20 IST