छत्रपती संभाजीनगर : आजघडीला १०० खाटा असलेल्या शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) महिनाअखेरपासून ‘डे केअर’सह एकूण ३०० खाटा रुग्णसेवेत दाखल होणार आहेत. रुग्णालयाच्या विस्तारीकरणातील सुविधांचे महिनाअखेर उद्घाटन होणार असून, वाढीव सुविधेमुळे राज्यभरातील कर्करोगग्रस्तांना मोठा आधार मिळणार आहे.
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या शासकीय कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आणि येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. २९ सप्टेंबर २०२० रोजी या रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. आता हे काम पूर्णत्वास गेले आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयाला नव्याने १६५ खाटा आणि अन्य सुविधांची भर पडली. २७ एप्रिल रोजी विस्तारीकरणाचा शुभारंभ केंद्रीय आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. विस्तारीकरणासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, आयुक्त, तसेच टाटा मेमोरिअल हाॅस्पिटलचे शैक्षणिक अधिष्ठाता डाॅ. कैलाश शर्मा, अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड आदींनी प्रयत्न केले.
टीव्ही, लाॅकरसह १६ खाटांचे ‘पेइंग रूम’विस्तारीकरणात १६ खाटांचे विशेष असे ‘पेइंग रूम’ साकारण्यात आले आहे. याठिकाणी टीव्ही, लाॅकर यासह सुसज्ज अशा सुविधा देण्यात येणार आहेत.
विस्तारीकरणातील सुविधा?शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणात सध्याच्या इमारतीवर तिसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले. याठिकाणी जनरल वॉर्डसह एमआयसीयू साकारण्यात आले आहे. अत्याधुनिक अशी यंत्रसामग्रीही दाखल झाली आहे. नव्या यंत्रसामग्रीमुळे किरणोपचारातही वाढ झाली आहे.
विस्तारीकरणाचा मोठा फायदाटाटा मेमोरियल हॉस्पिटलचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. कैलाश शर्मा म्हणाले, शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे २७ एप्रिल रोजी उद्घाटन होईल. या विस्तारीकरणाचा रुग्णसेवेला, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी मोठा फायदा होईल.