गंगापूर : तालुक्यातील वैयक्तिक विहिरींचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी केळकर यांना दिवसभर कोंडून टाकल्याची घटना सोमवारी घडली़ तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. पैकी बहुतांश विहिरींसाठी सहा महिन्यांपूर्वी संबंधित विभागातर्फे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते़ मात्र या विहिरींचे काम अद्याप सुरू करण्यात आलेच नाही. शासकीय स्तरावर रोहयोमधून रस्ते, विहीर, शेततळे, अशा अनेक कामांना मंजुरी देण्यात आली असताना अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे सर्वच कामे बंद आहेत. कामे उपलब्ध असताना प्रशासन काम सुरू करत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष जाधव, पं़स़ कृष्णा सुकाशे, छाया वाघचौरे, अनिल खवले, संजय तिखे, नितीन कऱ्हाळे, बबन म्हस्के यांच्यासह ३० ते ३५ शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली़ कार्यारंभ आदेश असलेली सर्वच कामे सुरू करा असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. सकाळी १०़३० वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते़ या प्रकरणी आंदोलकांनी केळकर यांना जाब विचारल्यावर केळकर यांनी आंदोलकांना सदर काम आताच सुरू करू नका, अशी वरिष्ठांनी तोंडी सूचना केली आहे़ त्यामुळे काम सुरू करता येत नाही असा लेखी खुलासा दिला़ तसेच वरिष्ठांचे आदेश येताच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले तेव्हा कुठे आंदोलकांनी त्यांची वाट मोकळी करून दिली़
रोहयोच्या कामासाठी बीडीओंना कोंडले
By admin | Updated: December 1, 2015 00:30 IST