औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडून देतो, असे आमिष दाखवून आतापर्यंत अनेकांना सुमारे ३५ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या साहेब खान यासीन खान पठाण ऊर्फ सत्तार बाबा ऊर्फ हकीमसह त्याच्या अन्य दोन साथीदारांना पहिले तर्द्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी अटकपूर्व जामीन नाकारला.आरोपी साहेब खान यासीन खान पठाण ऊर्फ सत्तार बाबा ऊर्फ हकीम (रा. अजीम कॉलनी, नारेगाव), शेख मुक्तार शेख रज्जाक (रा. करमाड) आणि आरोपी जावेद खान साहेब खान पठाण (रा. अजीज कॉलनी) यांच्या विरोधात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून दीपक दुर्गादास दुबे (२३, रा. अकोला) आणि त्यांच्या मित्रांना ४ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय आरोपीविरोधात अन्य दोन फिर्यादींच्या तक्रारीवरून वेगवेगळे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना या गुन्ह्यात पोलिसांचीही मदत झाल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला. हा अर्ज सुनावणीसाठी न्यायालयासमोर आला असता सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपींच्या विरोधात वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर लोक तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, त्यांनी ३५ लाख ३० हजार रुपयांना गंडविलेले आहे. ते महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांत आपले एजंट पाठवून लोकांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून बोलवीत असत. त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्यानंतर ते फरार होत असत. त्यांनी लुटलेली रक्कम जप्त करायची आहे, त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती केली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला.
भोंदू बाबाला अटकपूर्व जामीन नाकारला
By admin | Updated: August 9, 2014 01:09 IST