बीड: ‘जयभीम’चा घोष... ढोल- ताशांचा गजर... नीळ्या रंगाची उधळण, भीमगितांवर थिरकणारी तरुणाई... अशा सळसळत्या उत्साहात मंगळवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. समता रॅली, मिरवणुकांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. अभिवादनासाठी प्रचंड भीमसागर उसळला होता. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम पार पडले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास समता रॅलीला प्रारंभ झाला.पोलीस अधीक्षक नवीनचंद रेड्डी यांनी ज्योत घेऊन रॅलीत सहभाग नोंदविला. सुभाषरोड, माळीवेस चौकातून रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाली. तेथे रॅलीचा समारोप झाला.मंगळवारी सकाळपासूनच अभिवादनासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ गर्दी होण्यास सुरुवात झाली. लहान मुले, महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. गर्दीच रुपांतर अक्षरश: जनसागरात झाले. भन्ते पट्टीसेन यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन झाले तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. विनायक मेटे, युवा रिपार्इंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, न.प. चे गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि.प. सभापती संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, काँग्रेसचे अशोक हिंगे, दिलीप भोसले, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, अजिंक्य चांदणे, प्रा. प्रदीप रोडे, चंद्रकांत नवले, अमरसिंह ढाका, प्रा. सुशीला मोराळे, अजय सवाई, विनोद इनकर, तत्वशील कांबळे, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, शाहेद पटेल आदी उपस्थित होते. गेवराई, माजलगाव, परळी, आष्टी, वडवणी, धारुर, अंबाजोगाई, शिरुर, पाटोदा, केज येथे देखील जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम झाले. मिरवणुकीत थिरकली तरुणाईमंगळवारी शहरात ठिकठिकाणी अभिवादन सभा, व्याख्यान, रॅली, मिरवणुका आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी विविध गितांवर ढोल- ताशाच्या गजरात तरुणाईची पाऊले थिरकली. ‘लई मजबूत भीमाचा किल्ला, भीमा तुझ्या जन्मामुळे, कसा शोभला असता भीम माझा नोटावऱ़़ आहे कोणाचं योगदान...? लाल दिव्याच्या गाडीला...’ या आणि अशा विविध गितांनी शहर अक्षरश: दणाणून गेले.
भीमसागर उसळला..!
By admin | Updated: April 15, 2015 00:44 IST