लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अॅड. त्र्यंबकनाना भिसे यांच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान ठरले. शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी धुसफूस सुरू केली होती. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हवा धीरज देशमुख यांच्या नावाची आली. मात्र ही हवा काही त्यांच्या उमेदवारीत बदलली नाही. तासाला एका नवीन चर्चेने ‘लातूर ग्रामीण’च्या उमेदवारीवरुन झालेल्या काँग्रेसच्या ढिसाळ नियोजनाच्या पोरखेळाने मात्र स्व. विलासराव देशमुखानंतर पोरकी झाल्याचे क्षणोक्षणी जाणवत होते. जशी लातूर ग्रामीणमधून त्र्यंबक भिसेंची उमेदवारी घोषित झाली. तशी कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी रेटली. पार मुंबई, दिल्लीपर्यंत सूत्रे हलली. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवार बदलण्याच्या हालचालीनी वेग घेतला. शनिवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.धीरज देशमुखांचे नाव येताच हौसी कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत रॅली गाठली. पण अपेक्षाभंग झाला आणि धीरज यांनीच स्वत: पुढे येत त्र्यंबक भिसे हेच उमेदवार असतील, असे घोषित केले. जिल्हा काँग्रेस कमिटीनेही पत्रक काढून भिसे हेच उमेदवार असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न सुरू केला. धीरज देशमुख यांच्या नावाची फक्त चर्चाच रंगली़ त्यांनी स्वत: भिसे नानांचे नाव जाहीर केल्याने चर्चेला पुर्णविराम मिळाला़ परंतु, त्यांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यातला उत्साह जाणवला नाही़पडद्याआड नेमके काय झाले ? हे मात्र अद्याप उघड झाले नाही. परंतु, आता त्र्यंबक भिसे हेच लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढणार आहेत़ कार्यकर्त्यांची मोट आता ते कशी बांधतात याकडे डोळे आहेत़ (प्रतिनिधी)४काँग्रेसमध्ये लातूर ग्रामीणच्या उमेदवारीवरुन दिवसभर लातुरात ढिसाळ नियोजनाचा चांगलाच पोरखेळ रंगला. स्व. विलासराव देशमुख यांच्यानंतर जिल्ह्याची काँग्रेस पोरकी झाली. याची प्रचिती आता येते आहे. दिलीपराव देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने आ. वैजनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु त्यांचे सत्यकथनही पचनी पडले नाही. कारण अॅड. त्र्यंबकनाना भिसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारीवरुन ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी पुन्हा धीरज देशमुख यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र त्यांनीच भिसे हेच उमेदवार असल्याचे जाहीर केले. विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यासारख्या शिस्तबध्द नेत्यांनी राबविलेले नियोजन आता या निवडणुकीत काँग्रेसने हरवून पोरखेळ केल्याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली होती.
भिसेंच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान !
By admin | Updated: September 28, 2014 00:42 IST