जालना : जिल्ह्यात वाढलेल्या भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचा सूर लोकमतने मंगळवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून उमटला. अखंड वीज मिळण्यासाठी नागरिकांनीही वीज बिल भरण्यासाठी पुढे येण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केली. वीजचोरी रोखण्यासाठी जनजागृती केल्यास हे प्रमाण निश्चित कमी होईल असेही काही वाचकांचे म्हणणे आले. वाढते भारनियमन, वीजचोरी संदर्भात लोकमतने मंगळवारी प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले. भारनियमनास सर्वच जनता जबाबदार आहे का? या प्रश्नावर ७० वाचकांनी नाही असे उत्तर दिले. १० टक्के वाचक होय म्हणतात तर २० टक्के वाचकांनी माहिती नाही असे उत्तर दिले. यामुळे भारनियमनाला सर्वच जनतेला दोषी ठरविणे योग्य नसल्याचे चित्र दिसून आले. वीजचोरीमुळे भारनियमन वाढले का ५० वाचकांनी होय उत्तर दिले. तर ४० वाचक नाही म्हणतात तर १० वाचकांना याबद्दल माहिती नाही. वीजचोरी बंद झाल्यास भारनियमन थांबेल असा ५५ टक्के लोकांना वाटते तर तब्बल २५ टक्के वाचनकांना वीजचोरी कमी झाली तरी भारनियमन थांबणार नाही असे वाटते. २० टक्के वाचकांना माहिती नाही असे उत्तर दिले. भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचे ४५ टक्के लोकांना वाटते ३० टक्के लोकांना नाही असे वाटते तर २५ टक्के नागरिकांना माहिती नाही. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण कमी पडते का? यावर ७५ टक्के वाचकांनी महावितरणला दोषी धरले तर २५ नागरिकांनी नाही असे उत्तर दिले. वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड वीजमीटर बसवावेत का या विषयावर ६५ टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले. २५ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले तर १० टक्के वाचनकांना माहित नाही. महावितरणने जनजागृती केल्यास अथवा वीज बिलांतील दुरूस्ती केल्यास वीज ग्राहक थकित बिल भरण्यास पुढे येतील असेही अनेकांनी सांगितले. अनेकदा महावितरणकडून चुकीचे बिल येत असल्याने नागरिक बिल भरण्यास अनुत्सुक असतात. एकूणच या सर्व्हेक्षणातून जनतेने काहीअंशी महावितरणला दोषी ठरविण्यासोबतच नागरिकांनी सजग भूमिका बजावावी, असे अधोरेखित केले. (टीम लोकमत)
भारनियमनास महावितरणच जबाबदार..!
By admin | Updated: November 25, 2015 00:19 IST