बीड : जिल्ह्यात रबीचा पेरा पूर्ण झाला असून, पोषक वातावरणामुळे पिके जोमात आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असल्याने ज्वारीवर साखरचिकटा पडला आहे. दुसरीकडे गहू, हरभऱ्याची वाढ मात्र जोमात होऊ लागली आहे.यंदा रबीचे क्षेत्र ६८ हजार हेक्टरने घटले आहे. ३ लाख १० हजार २२७ सरासरी हेक्टर क्षेत्रापैकी १५ डिसेंबरपर्यंत ३ लाख ५० हजार हेक्टरवर पेरा होऊन ११५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र ज्वारी पिकाने व्यापले आहे. पहिल्या पेऱ्यातील ज्वारी पोटऱ्यात आली असून, वाढत्या थंडीमुळे ज्वारीवर साखरचिकट्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्वारीला पिळा बसून कणीस वाढीला धोका निर्माण झाला आहे. ज्वारी हे रबीतील प्रमुख पीक असून, यालाच धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे.दुसरीकडे गेल्या पाच वर्षांतून यंदा गव्हाच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने गहू, हरभरा या पिकांबाबतीत चिंता मिटली आहे. शिवाय, थंडीमुळे या पिकांना वातावरण पोषक बनले असून, महिनाभरापूर्वी पेरणी झालेल्या या दोन्ही पिकांची वाढ जोमाने होऊ लागली आहे. ४७ हजार हेक्टरवर गहू, तर १ लाख २० हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झालेला आहे. प्रमुख पिकांबरोबर मका, करडई, जवस आदींची लागवडही झाली आहे. रबीला धोका निर्माण झाल्याने कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)
थंडीचा रबी पिकांना फायदा अन् तोटाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 00:04 IST