औरंगाबाद : शहरात ज्या भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून महापालिकेने चार दिवसांपूर्वी घोषित केले. मात्र, त्या भागात महापालिकेचा एकही कर्मचारी फिरकला नाही. गुरुवारी शहरात अचानक केंद्रीय पथक दाखल होताच सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये महापालिकेने बॅनर लावण्याची तत्परता दाखविली.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टीमकडून शहरातील कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार रविवारी ४ एप्रिल रोजी महापालिकेने शहरात २६ कंटेन्मेंट झोन जाहीर केले. यात कोरोनाचे बिग हॉटस्पॉट म्हणून ८, मध्यम कंटेन्मेंट झोन म्हणून १२ आणि मायक्रो झोनमध्ये सहा वसाहतींचा समावेश केला. कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांना बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना आत येण्यावर निर्बंध घातले जाणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी जाहीर केले होते. मात्र कंटेन्मेंट झोन जाहीर करून तीन दिवस उलटूनही बॅनर्स लावण्यात आले नव्हते. गुरुवारी कोरोनाची येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक शहरात दाखल झाल्याचे कळताच पालिकेने कंटेन्मेंट झोनमध्ये बॅनर्स लावले. मात्र प्रभावी उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्याचे दिसून आले.
महापालिकेकडून फक्त औपचारिकता पूर्ण
कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांना बाहेर जाण्यास आणि बाहेरील नागरिकांना आत प्रवेश करण्यास सक्त मनाई असल्याची सूचना प्रतिबंधित क्षेत्राच्या बॅनर्सवर दिलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधितांवर साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कडक कारवाई किंवा गुन्हा दाखल केला जाईल, असेही नमूद केले आहे. मात्र या आदेशाचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेची वा पोलीस प्रशासनाची कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित नाही.