राजकारणाच्या वाटांवर चकवे असतात आणि कसलेल्या राजकारण्यांना चकवा गाठतोच. चित्तेपिंपळगावच्या वाटेने निघालेली औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्तासुंदरी अशा काही चकव्यात अडकली आणि तिला दिशाभूल पडली. यातच दक्षिणेकडे जाणारी सत्तासुंदरी थेट उत्तरेला सिल्लोडमध्ये येऊन पोहोचली आणि सोयगावमार्गे नागदमध्ये पुन्हा स्थिरावली. या सत्तासुंदरीचा अनेक वर्षांपासूनचा गड हा नागद असला तरी, प्रत्येकवेळी वेगळी दिशा घेत ती नागदमध्ये विसावते. दोन वर्षांपूर्वी तिने तिरंगा सोडून भगवे वस्त्र धारण केले आणि आता तर वाघावर स्वार झाली. वाघाची स्वारी करणे सोपे; पण उतरणे अवघड, अशी जुनी-जाणती माणसे म्हणतात. म्हणून वाघावर स्वार झालेले नितीन पाटील आपली मांड कशी पक्की ठेवतात, याकडेच लक्ष राहील.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसला आणि नितीन पाटलांनी परवा ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधले आणि आता बँकेवर शिवसेनेची सत्ता आली, अशी घोषणा सेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी केली. त्यांच्या घोषणेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बँकेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढली गेली नाही. भाजपचे आमदार आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणी हरिभाऊ बागडे यांनी आज सत्तेवर आलेल्या पॅनलचे पितृत्व स्वीकारले होते; परंतु तेच पराभूत झाले. त्यांच्या पराभवाभोवती संशयाचा भोवरा फिरतो आहे. नानांना चकवा केला, अशी चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात रंगली आहे. नानांच्या शेतकरी विकास पॅनेलचा चेहरा नसलेले उमेदवार निवडून येतात; पण नानांचा पराभव होतो, म्हणजे कुठे तरी पाणी मुरले, असे म्हणायला वाव आहे. कारण जिल्हा बँकेच्या राजकारणात इतकी वर्षे राहूनही त्यांचा पराभव कसा होऊ शकतो? म्हणजे नानांचा कोणीतरी चकवा केला असण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळालेल्या पॅनलच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर, आज ना उद्या नितीन पाटील मातोश्रीच्या वाटेवर दिसतील, याचा अंदाज आला होता; पण हे इतक्या झटपट घडेल याची खात्री नव्हती. याचा अर्थ असा की, निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केले होते; पण निवडून आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात तरच अध्यक्षपद मिळेल, अशी अट घातली होती, हे नक्की आणि तातडीने शिवबंधनाचा कार्यक्रम उरकून घेतला. हरिभाऊ बागडे निवडून आले असते, तर नितीन पाटील शिवसेनेत गेले असते का, हा आजचा नवा प्रश्न आहे.
बँकेचा कारभार निर्वेध करता यावा यासाठी दोन वर्षांपूर्वी नितीन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, कारण त्यावेळी फडणवीसांचे सरकार सत्तेवर होते. आता त्यांनी हाच सोयीचा मार्ग स्वीकारलेला दिसतो.
जिल्ह्याचे राजकारण बँकेभोवती फिरते. आता या निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाची नवी मांडणी आकार घेईल. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे मंत्रीद्वय आणि आ. अंबादास दानवे यांच्या हाती ही सूत्रे आली. जिल्ह्यात सेनेचे आठ आमदार आहेत. शिवाय बँकेच्या राजकारणात बागडेंची अनुपस्थिती. त्यातही या तिघांपैकी भुमरेंचा विचार केला, तर आज सेनेचे सर्वांत ज्येष्ठ आमदार तेच आहेत; पण ३० वर्षांच्या राजकारणात ते पैठणच्या बाहेर आले नाहीत. अंबादास दानवे हे १७ वर्षांपासून जिल्हाप्रमुख असून सेनेचे जिल्हा राजकारण त्यांनी आपल्या कह्यात ठेवले आहे. एवढा प्रदीर्घ काळ जिल्हाप्रमुख राहिलेली व्यक्ती सेनेत नाही आणि त्यांना बदलण्याचा विचार असला तरी, सेनेसमोर पर्याय सध्या तरी दिसत नाही.
या दोघांसोबत विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत आलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा लेखाजोखा तपासला, तर राजकारणात ते ३० वर्षांपासून आहेत. आपले स्वत:चे स्थान निर्माण करण्याइतके ते धोरणी असल्याने केवळ दीड वर्षात त्यांनी सेनेत स्थान निर्माण केले. शिवाय ‘मातोश्री’वरील उठबस वाढली आहे. थेट पक्षप्रमुखांशी संपर्क महत्त्वाचा ठरतो. आपला मतदारसंघ मजबूत ठेवत त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रभाव टिकवून ठेवत, आता जिल्हा बँकेचे राजकारण हाती घेतले. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणाचा वेगळा पट लवकरच दिसेल. नवा गडी नवे राज्य या न्यायाने आता राजकारणाच्या पटावर नवी प्यादी खेळताना दिसतील. ही नवी मांडणी करण्यासाठी कोरोनाची आपत्ती इष्टापत्ती ठरली आहे. फुरसतीने ही मांडणी होईल. बँकेची सत्तासुंदरी नागद गडावर दीर्घकाळ विसावण्याची ही चिन्हे आहेत.
-सुधीर महाजन