छत्रपती संभाजीनगर : आसाममधील श्रीरामपूर ते ढोबरी या रस्त्याचे ३९४ कोटींच्या कामात भागीदार बनण्याचे आमिष दाखवून शहरातील कंत्राटदाराची १.१५ कोटी रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी हैदराबादमधील बडे कंत्राटदार, सृष्टी कन्सटेक प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक जे. राजशेखर व अन्य संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंत्राटदार विवेक गवई यांची २०१९ मध्ये आरोपी राजशेखरसोबत ओळख झाली होती. मे, २०२२ मध्ये त्यांना राजशेखरने आसाममधील एका रस्त्याच्या कामात भागीदारी करण्यासाठी विचारणा केली. त्यासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचे डिपॉझिट देण्याची अट घातली. विश्वास ठेवून गवई यांनी त्याच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली; परंतु काही दिवसांतच आरोपीच्या कर्मचाऱ्यांनी गवई यांना संपर्क करून टेंडर मिळाले नसल्याचे सांगितले. शिवाय, ७ ऑक्टोबर, २०२२ रोजी अनामत रकमेसाठी गॅरंटीसाठी दिलेले कागदपत्रे परत देण्याची विनंती केली. गवई यांनी विश्वासाने ती देखील परत केली.
राजशेखरच्या वागण्यात बदलमूळ कागदपत्रे प्राप्त होताच राजशेखरच्या वागण्यात बदल झाला. त्याने गवई यांच्या कॉल, मेसेजला प्रतिसाद देणे कमी केले. गवई यांनी वारंवार त्याच्या कार्यालयात भेटण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेटू दिले गेले नाही. पैशांचा तगादा सुरूच राहिल्याने राजशेखरने २० लाख रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर पूर्णपणे संपर्क बंद केला. त्यानंतर गवई यांनी पोलिसांकडे धाव घेतली. उपनिरीक्षक विनोद आबूज तपास करत आहेत.