बीड : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, बच्चेकंपनीला चाहूल लागते ती मनसोक्त खेळण्याची. सिमेंटचे जंगल वाढत असताना मुलांना खेळण्यासाठी मात्र उद्यानांची कमतरता जाणवत आहे. बीड शहराच्या चारही बाजूंना मुलांना खेळण्यासाठी उद्यान आहेत. मात्र या उद्यानाची अवस्था मात्र ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. बीड शहरातील ‘चमन’ची मराठवाड्यात ओळख होती. मात्र, १९८९ साली बिंदुसरेला आलेल्या पुरामुळे हे चमन होत्याचे नव्हते झाले. आता येथे न.प.ने यशवंत उद्यान तयार केले आहे. उद्यानात आता हिरवळ असली तरी येथे खेळण्यांचा अभाव आहे. येथील अनेक खेळणीही तुटल्या आहेत. यामुळे बच्चेकंपनी हिरमुसत आहे. शहरातील आणखी एक उद्यान म्हणजे खासबाग उद्यान होय. या उद्यानाची तर सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. येथे ना खेळणी आहेत ना कोणतीच व्यवस्था. येथे वर्षभरापासून विविध कामे सुरू आहेत. ती अद्यापही रेंगाळलेलीच आहेत. हे उद्यानही प्रशस्त आहे. खेळणी नसल्याने बच्चेकंपनी उद्यानाकडे फिरकतच नाहीत. खेळणीही तुटलेल्याच.... शहरातील खासबाग, यशवंत या उद्यानातील खेळणी तुटलेल्या आहेत. घसरगंडीचा पत्रा उचकटल्याने या खेळणी लहान मुलांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. उद्यानातील कचराही वेळोवेळी उचलला जात नसल्याने येथे घाण साचली आहे.
खेळणीच नसल्याने बालोद्याने ओस
By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST