बुधवारी एकाच दिवसात तालुक्यात १ हजार ९७० जणांचे लसीकरण करण्यात आले. हा आजपर्यंतचा लसीकरणाचा विक्रम आहे. एकट्या पिशोर गावात ४५८ जणांनी लस टोचून घेतली.
लसीकरण करण्यासाठी गावागावांमधून शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व प्रशासन यांची सांगड घालून शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यात येत आहे.
नागरिकांनी लसीकरणाबाबत मनात कोणतीही भीती बाळगू नये, लस एकदम सुरक्षित आहे. तसेच लस घेतल्याने शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत, ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने लस टोचून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, मुख्याधिकारी हारुन शेख, तालुका आरोग्याधिकारी डॉ. हेमंत गावंडे व पदाधिकारी हे थेट जनतेशी संपर्क साधून लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करीत आहेत.
दरम्यान, मागील २४ तासांत तालुक्यात नवीन ७७ रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहरातील १७ तर ग्रामीणमधील ६० रुग्णांचा समावेश आहे.