औरंगाबाद : फारशी शहनिशा न करता घाटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एक दिवसाच्या मयत बाळाला नातेवाईक सोडून गेल्याची तक्रार पोलिसांत केली. परिणामी, बेवारस म्हणून जाहीर केलेल्या त्या बाळाचे आज शवविच्छेदन करावे लागले. विशेष म्हणजे, बाळाची आई घाटी हॉस्पिटलमध्येच एका वॉर्डात उपचार घेत आहे. वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील रहिवासी सविता कचरू दिवेकर (२२) या विवाहितेस प्रसूतीसाठी ८ जून रोजी रात्री तिच्या नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिने वॉर्ड क्रमांक ३० मध्ये काल सोमवारी एका कन्येला जन्म दिला; परंतु जन्मताच बाळाचे वजन कमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्या बाळाला लहान मुलांसाठी असलेल्या अतीवदक्षता विभागात हलविले. अतीवदक्षता विभागात बाळावर उपचार सुरू असताना ते मध्यरात्रीच्या सुमारास मरण पावले. बाळ मरण पावल्यानंतर ड्यूटीवर असलेल्या डॉक्टर व नर्सेस यांनी वॉर्डाबाहेर येऊन नातेवाईकांचा शोध घेतला. तेव्हा तेथे कोणीही उपस्थित नव्हते. सविता ही ३० नंबरच्या वॉर्डात दाखल होती. तिच्याजवळ देखभाल करण्यासाठी तिची आई होती. दरम्यान, बाळाला घाटीत बेवारस सोडून नातेवाईक पळून गेले असावेत, या कल्पनेतून डॉक्टरांनी घाटी हॉस्पिटलमधील पोलीस चौकीत जाऊन बाळाला बेवारसपणे सोडून नातेवाईक पळून गेल्याबद्दल तक्रार नोंदवली. घाटी चौकीतील पोलिसांनी यासंबंधीची तक्रार पुढे शिवूर पोलिसांना कळवली. त्यानुसार शिवूर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. सकाळी जेव्हा सविता दिवेकर या विवाहितेची आई बाळाला पाहण्यासाठी अतीवदक्षता विभागात गेली, त्यावेळी हा प्रकार समोर आला.
एक दिवसाच्या बाळाचे शवविच्छेदन
By admin | Updated: June 11, 2014 00:53 IST