औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात लवकरच १५० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. तब्बल १९०० सीसीटीव्ही, ३२ शहर बस, स्मार्ट स्ट्रीट लाईट, वायफाय फ्री यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन आदी असंख्य कामांचा यात समावेश असल्याची माहिती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आज पत्रकारांना दिली.
माहिती तंत्रज्ञान सचिव श्रीनिवासन, संचालक शंकर नारायण यांनी सोमवारी उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत मुंबईत आढावा बैठक घेतली. बैठकीसंदर्भात माहिती देताना मुगळीकर यांनी सांगितले की, १७३० कोटींचा स्मार्ट सिटीचा प्रकल्प असून, त्यातील ३४७ कोटी पॅनसिटीवर, तर उर्वरित पैसे ग्रीनफिल्डअंतर्गत खर्च करण्यात येतील. पॅनसिटी अंतर्गत १५० कोटींच्या कामांना होकार देण्यात आला. येत्या आठवडाभरात या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निविदा मनपाने काढावी का आयटी कार्पोरेशन काढणार, हे अद्याप निश्चित नाही.
१५० कोटीची कामे
१९०० सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्यात येणार आहेत. पोलीस विभाग व महापालिका यांच्यासाठी दोन स्वतंत्र कंट्रोल रूम राहतील. ५७ स्मार्ट शहर बसथांबे, सर्वच पोलीस ठाणे सीसीटीव्हीशी जोडली जातील.
३५ शहर बस खरेदी करण्यात येतील. त्यातील ५ बस तातडीने खरेदी करण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे.
सोलार प्रकल्प, वायफाय महापालिका मुख्यालयावर सोलार पॅनल प्रकल्प बसविण्यात येईल. या कामावर ५३ लाख रुपये खर्च करण्यात येतील. हे काम आगामी तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. वायफाय फ्री सिटी करण्यासाठी ११७८ जागा अंतिम करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध भागांत ८७ डिजिटल साईन बोर्ड लावले जातील.
स्मार्ट पथदिवे, घनकचरा मनपाने पथदिव्यांसाठी एलईडी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प स्मार्ट सिटीतून राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ७० कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या येत्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. नारेगाव येथील कचरा डेपोतील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.